Monday, December 20, 2010

अशोक चव्हाण (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)


२६/११च्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरून जावेत, असे अनेकांना वाटत होते. मात्र ते जातील असे अनेकांना वाटत नव्हते. विलासरावांची महाराष्ट्राच्या राजकारणावरील पकड आणि दिल्लीतील सोनिया गांधींच्या गुडबूक्समधील नेत्यांबरोबर असलेला दोस्ताना पाहता त्यांच्या अश्वमेधाच्या घोडय़ाचा लगाम खेचणार कोण, असा प्रश्न होता. मात्र विलासरावांच्या उचलबांगडीचे संकेत मिळाले आणि काँग्रेसचा पुढचा मुख्यमंत्री कोण याच्यावरचा सट्टा तेजीत आला.

त्यातही पहिल्या टप्प्यात वेगाने धावणाऱ्या नारायण राणे यांच्यावर बहुतांश जण आपली बोली लावून मोकळेही झाले. शिवसेनेला भगदाड पाडून काँग्रेसमध्ये आलेल्या राणेंना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन थेट सोनियांनी दिल्याचे दाखले दिले जाऊ लागले. राणेंनी मोर्चेबांधणीही अत्यंत जोरदार केली होती. माहौल असा होता की, विलासरावांच्या मंत्रिमंडळात राजकीयदृष्टय़ा अगदीच दुय्यम गणले जाणारे उद्योग खाते सांभाळणारे अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे फारच कमी जणांना वाटत होते. मात्र चेहऱ्यावर व बोलण्यात कायम संयतपणा असणाऱ्या अशोकरावांनी दिल्लीला स्वतचे महत्त्व यशस्वीरित्या पटवून दिले. काँग्रेसी राजकारणाच्या आखाडय़ात कोकणी पैलवान खुराक व मेहनत दोन्हीत कमी पडत असल्याचे खरे तर तेव्हाच स्पष्ट झाले होते. ८ डिसेंबर २००८ रोजी अशोक चव्हाण यांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २६/११चा दहशतवादी हल्ला, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई, अनेक प्रश्न आवासून समोर उभे होते आणि राणेंसह नाराज काँग्रेसमधील गटातटांना घेऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकांना उण्यापुऱ्या वर्षभरात सामोरे जायचे होते. मुख्यमंत्र्यांच्या काटेरी खुर्चीत अशोक चव्हाण बसताना विलासराव मिशीतल्या मिशीतले मिश्कील हास्य त्यामुळेच अनेकांपासून लपून राहिले नाही. अशोक चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी समारंभातून बाहेर पडता पडता काँग्रेसी नेते आणि ज्येष्ठ पत्रकारांमध्ये अशोकरावांची विकेट लवकरच जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या, त्या मागे अशी अनेक कारणे होती.
मात्र चेहरा आणि वाणीवर कोणतेही भाव न येऊ देता राजकारणात गुपित घाला कसा घालायचा याचे धडे ज्या गुरूकडून विलासराव देशमुख यांनी घेतले त्या शंकरराव चव्हाण यांचे पुत्र असलेल्या अशोक चव्हाण यांनी एका मागोमाग एक असे काही राजकीय फासे टाकले की, आज काँग्रेसांतर्गत विरोधकांपासून ते सेना-भाजपपर्यंतच्या विरोधी पक्षापर्यंत सगळेच त्यांचे ‘पाळीव’ असल्याप्रमाणे शेपटय़ा हलवत त्यांच्या समोर उभे असल्याचे चित्र पहायला मिळते.
मुख्यमंत्री निवडीसाठी दिल्लीहून आलेल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे नारायण राणे यांच्या विरोधात विलासराव देशमुख यांनी आपल्या एकेकाळच्या गुरूच्या मुलाच्या बाजूने काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे कौल दिला होता. राणे मुख्यमंत्री झाले तर ते आपल्याला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणत्याही थराला जातील आणि अशोक चव्हाण यांना आपण कधीही गुंडाळून ठेऊ, अशा भावनेने विलासराव यांनी ही खेळी खेळली होती. ८ डिसेंबर २००८ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अशोक चव्हाण पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे पक्षाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी विलासराव देशमुखही होते. दोघांचे हास्यविनोद करतानाचे चित्रण विविध वाहिन्यांवरून दाखविले जात होते. विलासराव व अशोकराव यांच्यात कोणतेही वितुष्ट राहिलेले नसून अशोक चव्हाण आता त्यांच्याच सल्ल्याने राज्यशकट हाकणार, असे त्यामुळेच अनेकांना वाटू लागले होते. मात्र इंदापूरचा हा दौरा झाल्यावर दुसऱ्याच दिवशीच्या मंत्रिमंडळ बैठकीत अशोक चव्हाण यांनी मराठवाडय़ाचे विभागीय आयुक्तालय लातूर ऐवजी नांदेडला नेण्याचा निर्णय घेतला आणि विलासराव देशमुख पार गडबडून गेले. वार करताना समोरच्याला अंदाज येऊ द्यायचा नाही आणि एकाच झटक्यात काम तमाम झाले पाहिजे, हा अशोकरावांचा खाक्या तेव्हा पहिल्यांदाच सामोरा आला. मवाळ पर्सनॅलिटीच्या अशोकरावांना सहज घेऊन चालणार नाही, याचा अंदाज तेव्हाच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणाक्ष राजकीय नेत्यांना बरोब्बर आला होता. राजकीयदृष्टय़ा विलासराव देशमुख यांच्यासाठी तर हा फार मोठा झटका होता. विभागीय कार्यालय लातूरला नेण्याची प्रक्रिया विलासराव देशमुख यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू केली होती. ती जवळपास पूर्णही झाली होती. त्याची घोषणाही करण्यात आली होती. फक्त औपचारिक गोष्टी तितक्या उरल्या होत्या. आता आपण राज्याचे मुख्यमंत्री नाही, याची पहिली जाणीव विलासरावांना या एकाच निर्णयाने आली. यापुढे अशोक चव्हाण यांना ‘‘कलका बच्चा है, देख लेंगे’’ या थाटात घेऊन चालणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. मात्र अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावरची रेषाही या दरम्यान हलली नाही. नांदेड हे विभागीय कार्यालयासाठी कसे योग्य ठिकाण आहे. रेल्वेने जोडलेल्या या ठिकाणी परभणी, हिंगोली, अगदी लातूर जिल्ह्याच्या टोकाला असलेल्यांना येणेही कसे सोयिस्कर आहे, याचे पद्धतशीर विश्लेषण अशोक चव्हाण राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकारांना सांगत होते. या जबरदस्त घावाने घायाळ विलासराव त्यातून सावरले की, आपल्या मार्गात काटे पेरणार याची जाणीव ठेवूनच ही खेळी अशोक चव्हाण यांनी खेळली होती. त्यांच्यावरील नाराजांच्या यादीत राणेंच्या बरोबरीने आता देशमुखही आले होते. राजकारणात शत्रू वाढवणे चांगले नाही, असे बोलले जाते. मात्र ‘राजकारणात शत्रू जितका शक्तीशाली तितकेच समर्थकही कट्टर बनतात,’ असे विन्स्टन चर्चिल म्हणत असे. ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ राजकारणात किंवा व्यवसायात मोठे यश मिळवून देते. सात -आठ महिन्यांनी सामोरे जावे लागणाऱ्या निवडणुकांमध्ये यश मिळाले तर बलाढय़ असलेले हे दोन्ही विरोधक थंडावतील आणि कट्टर समर्थकांच्या यादीत मोठी वाढ होईल, याचा अंदाज असल्यानेच अशोकरावांनी काही ‘कॅलक्युलेटड रिस्क’ घेतल्या. मात्र निवडणुकीत यश मिळवणे फारसे सोपे नव्हते. १० वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला ‘अँटी इंकंबंसी’चा फटका बसणार होता. त्यात दहशतवाद, शेतकरी आत्महत्या आणि काँग्रेसांतर्गत भांडणे व काँग्रेस-राष्ट्रवादी स्पर्धा या सगळ्यांना योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे होते. येऊ घातलेल्या रणसंग्रमात कोणता व्यूह कशा पद्धतीने रचायचा याची पक्की गणिते अशोक चव्हाण यांच्या डोक्यात त्याचवेळी घोळत होती.
२००९च्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक आली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट वाटपात फिफ्टी-फिफ्टीचा हट्ट धरला. राज्यात आमची ताकद काँग्रेसच्या बरोबरीची आहे किंबहुना किंचीतशी अधिकच आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा तीन जागा अधिक येऊनही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दान दिले आहे, वगैरे वल्गना राष्ट्रवादीचे नेते करीत होते. काँग्रेसमधील गटातटापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली होती. एकाच वयोगटातील सगळे नेते एकमेकांच्या कण्या कापण्यासाठी आतुर होते. याची पक्की खबर ‘वर्षां’वर पोहोचत होती. दुसरीकडे राणे बाहेर पडल्याने अर्धमेला झालेला शिवसेनेचा ‘वाघ’ राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे अगदीच पाळीव प्राणी झाला होता. भाजपमध्ये मुंडेंना संपविण्यात गडकरी आणि गडकरींना शह देण्यात मुंडे इतके मग्न होते की राज्याच्या राजकारणात नक्की कोण कोणाविरोधात लढणार हेच समजेनासे झाले होते. या सगळ्या परिस्थितीचा पूर्ण अंदाज घेऊनच अशोकरावांनी लोकसभेची तयारी केली. दिल्लीला पूर्ण विश्वासात घेतले. प्रत्येक मतदारसंघात स्वतची स्वतंत्र यंत्रणा उभेी केली. उमेदवाराच्या परिस्थिीतीचे खरे विश्लेषण ही यंत्रणा मुख्यमंत्र्यांना देत असे. त्यातूनच मग कुठे, कसली आणि किती मदत आणि कुमक पोहोचवायची याचे निर्णय घेतले जात असत.
या सगळ्याचा परिणाम, लोकसभेचे निकाल आले, तेव्हा दिसून आला. ‘एकच वादा अजितदादा’ आणि ‘मुलूख मैदान तोफ’ आर. आर. आबा सगळ्यांची तोंडं पार सुकून गेली. राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या आठ जागा मिळाल्या तर काँग्रेस तब्बल १८ वर गेली. मुख्यमंत्र्यांची विकेट जाणार या चर्चा लोकसभेतील यशाने थोडय़ाशा का होईना थंडावल्या. मात्र काँग्रेसी नेत्यांची राजकारण करण्याची पद्धत पाहता त्या पूर्ण बंद होणे शक्यच नव्हते.
लोकसभेतील यशानंतरही अशोक चव्हाण यांचे पक्षांतर्गत विरोधक गप्प बसले नव्हते. ‘काहीही होऊ शकते,’ अशा पुडय़ा सर्रास सोडल्या जात होत्या. विधानसभा निवडणुकांसाठी सात आठ महिनेच बाकी होते. या कालावधित अशोक चव्हाण यांनी सामान्य माणसांसाठी नक्की कोणत्या योजना राबविल्या पाहिजेत, याबाबत अनेकांशी चर्चा केली. यात काही स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणारे निस्वार्थी कार्यकर्ते होते. काही पत्रकार, प्राध्यापक, तर काही काँग्रेसमधीलच अत्यंत तळागाळातील कार्यकर्ते. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शहरातील व ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी व विशेषत दारिद्रय़ रेषेखालील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची धोरणे जाहिर केली. यात कोकणाच्या सर्वागीण विकासासाठी ५२३२ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून राणेंना आणखी मोठा शह दिला. केंद्र सरकारने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीचा लाभ अनेकांना मिळाला नव्हता. अशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी ६२०८ कोटी रुपयांची विशेष योजना जाहीर केली. दारिद्रय़ रेषेखालील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे भाव रेशन दुकानांवर स्थीर ठेवण्यासाठी महिन्याला १२२ कोटी रुपये मंजूर केले. याचा योग्य तो परिणाम झाला. जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली. निवडणुकांमध्ये याचा योग्य तो परिणाम होणार हे अशोक चव्हाणांच्या चाणाक्ष विरोधकांना तात्काळ समजले. ‘लोकसभेला काँग्रेसला मिळालेल्या घवघवित यशामुळे आता काँग्रेसने विधानसभेला एकला चलोरे भूमिका घ्यायला हवी,’ असा नवा डाव विलासराव देशमुखांनी खेळायला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याचे आणि मंत्र्यांचे काम न चुकता करणाऱ्या विलासराव देशमुखांना आता अचानक बळ चढले होते. मात्र असे झाल्यास निवडणुकीनंतर ‘माळ्याचा मका आणि कोल्ह्यांची भांडणं’ असला प्रकार व्हायचा, हे अशोक चव्हाण यांना माहित होते. त्यांनी राष्ट्रवादीची ताकद कमी झाली असली तरीही राज्यात चौरंगी लढत होणे म्हणजे काँग्रेसला धोका असल्याचे दिल्लीला समजावून सांगितले.
निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही राज्यातील गरिबांच्या आरोग्यासाठी जीवनदायी योजनेची व्याप्ती वाढविण्याची घोषणा, शहरातील झोपडीवासीयांच्या सुरक्षिततेसाठीच्या घोषणा करून त्यांनी वातावरण सकारात्मक बनवले. सेना-भाजपला मोठा शह, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बसणार असा त्यांचा पक्का अंदाज होता. ते लक्षात घेऊनच अशोक चव्हाण यांनी उमेदवाऱ्या पक्क्या केल्या आणि त्याचेही फळ त्यांना मिळाले. काँग्रेसच्या तब्बल ८२ जागा आल्या तर राष्ट्रवादी ६२वर गेली. सेनेचे तर विरोधी पक्षनेते पदही गेले. अशोक चव्हाण यांनी घेतलेली ‘कॅलक्युलेटड रिस्क’ त्यांना मोठे यश देऊन गेली होती.
अशोक चव्हाणांच्या शालेय जीवनात घडलेल्या एका घटनेचा त्यांच्या मनावर अत्यंत खोल परिणाम झाल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. शाळेत असताना एकदा ते स्वतचे दप्तरच कुठेतरी विसरले होते. या प्रकाराने ते चांगलचे हबकले होते. त्या घटनेनंतर अशोक चव्हाण कोणतीही गोष्ट विसरत नाहीत. आयुष्यात घडलेली घटना असो, भेटलेली व्यक्ती असो, की स्वत जवळची वस्तू असो ते पक्की लक्षात ठेवतात. ऑक्टोबर २००९च्या निवडणुकीनंतर विजयाचे श्रेय कितीही त्यांचे असले तरीही, पुन्हा निवडणुकीच्या स्पर्धेत ‘जहांगिरी गेली तरी फुगीरी न गेलेल्या’ नेत्यांशी स्पर्धा करावीच लागणार हे त्यांना माहित होते. तशी ती त्यांना करावी लागलीच, पण दुसऱ्या खेपेची स्पर्धा फारशी तीव्र नव्हती. पहिल्या खेपेला नारायण राणे यांची असलेली स्पर्धा दुसऱ्या खेपेला फारच मवाळ झाली होती. त्यातही पहिल्या खेपेला राणे यांना उद्योग खाते देऊन त्यांना जरब बसविल्याने दुसऱ्या खेपेला राणे स्वत महसूल खाते मिळावे म्हणून वर्षांवर खेटे घालत होते. कुठलीही गोष्ट न विसरणाऱ्या अशोकरावांना राजकीय खुन्नस मात्र काढता येत नाही. त्यामुळेच राणे यांनी विलासरावांना बदलण्याचे नक्की झाल्यानंतर घातलेले धुमशान चव्हाणांच्या लक्षात असूनही त्यांनी राणेंचा योग्य सन्मान ठेवणेच पसंत केले. कोकणात काँग्रेसकडे बलाढय़ नेता नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कोकणात पाळेमुळे घट्ट रूजत असल्याचे लक्षात घेऊन अशोक चव्हाण यांनी स्वत पक्षश्रेष्ठींना सांगून राणे यांना महसूल खाते देऊ केले. काही जणांच्या मते पक्षांतर्गत शक्तीशाली विरोधकाला ताकद देऊन पुढील राजकारणात त्यांनी स्वतसाठी खड्डा खणून ठेवला आहे.
अशोक चव्हाण यांनी ७ नोव्हेंबर २००९ या दिवशी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अशोक चव्हाण हे अधिक शक्तीशाली बनून आल्याचे त्यांच्या विरोधकांनीही मान्य केले होते. त्यांनी घेतलेली ‘कॅलक्युलेटड रिस्क’ त्यांना फळली होती. पक्षांतर्गत विरोधकांच्या नाकावर टिच्चून त्यांनी काँग्रेसची ताकद ८२पर्यंत वाढवली होती. विधानसभेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांपैकी ८० टक्के आमदारांनी त्यांच्या दरवाजात जाऊन ‘आमचा पाठिंबा घ्या,’ अशी विनंती केली होती. राज्य शकट हाकणे आता त्यांना पुर्वीपेक्षा अधिक सुकर होते. मात्र तरीही विरोधक गप्प बसणार नव्हते व बसलेले नाहीत.
पहिल्या खेपेला पक्षांतर्गत सर्वात शक्तीशाली विरोधक विलासराव देशमुख यांना धडा शिकवलेल्या अशोक चव्हाण यांनी दुसऱ्या खेपेला मुख्यमंत्री झाल्या झाल्याच शिवसेनेला पार चितपट केले. राहूल गांधी यांचा मुंबई दौरा आणि शाहरूख खान यांच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने शिवसेनेने त्यांना स्वतच्या ‘होम पीच’वर म्हणजे मुंबईत आवाज दिला. विरोधी पक्षनेते पद गेल्याने पिसाळलेल्या शिवसेनेला मनसे आणि भाजपपुढे स्वतची ताकद सिद्ध करायची होती. मात्र राहूल गांधी आणि शाहरूख या दोन्ही व्यक्ती काँग्रेसच्या राजकारणात फारच मोठय़ा आहेत. अशोक चव्हाणांपुढे मोठे आव्हान होते. गृह खाते राष्ट्रवादीच्या आरआर आबांकडे गेले होते. आबा म्हणजे फारच धोरणी माणूस. मूर्ती लहान असली तरी गोड बोलून अगदी पंजाबी पैलवानाचासुद्धा पट काढून कधी अस्मान दाखविल याचा नेम नाही. मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी राहूल गांधी यांचा मुंबई दौरा आणि शाहरूख खान यांच्या सिनेमाचे प्रदर्शन या दोन्ही वेळी गृह खात्याची सारी सूत्रे स्वतच्या ताब्यात घेतली. राष्ट्रवादी आणि आर. आर. पाटील यामुळे प्रचंड चरफडले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जे काही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याची कुठेही वाच्यता झाली नाही. प्रत्यक्ष कृतीतूनच पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश शिवसेनेपर्यंत पोहोचवला. शिवसेनेच्या जन्मापासून मुंबई पोलिसांनी कधी दिला नसेल असा चोप शिवसैनिकांना या दोन्ही प्रकरणात दिल्याने शिवसेनेतील ‘करूपांडे’ गँगने या सरकारचा मोठाच धसका घेतला. दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच हा प्रकार झाल्याने अशोक चव्हाण यांचे काही दिवस तरी शांततेत जातील असे वाटत होते. मात्र पक्षांतर्गत विरोधकाच्या कामात कायम काडय़ा घालत राहणे हेच तर काँग्रेस पक्षाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
अशोक चव्हाण हे शंकरराव चव्हाण यांच्या कडक शिस्तीत लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांचे शिक्षण एमबीए. त्यामुळे त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ता असो वा पक्षातील आमदार, किंवा पत्रकार, आधी वेळ ठरवूनच ते कुणालाही भेटतात. कधीही आत घुसा आणि मुख्यमंत्र्यांसमोर भेटून समर्थकांपुढे इंप्रेशन तयार करा, याची सवय झालेले अनेक नेते-कार्यकर्ते या नव्या पद्धतीमुळे कातावले. त्यामुळे मुख्यमंत्री कुणालाही भेटत नाहीत, आमदारांनाच काय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही अपॉइंटमेन्ट घ्यावी लागते, अशी कुजबुज सुरू झाली. कुठलाही कागद नीट वाचल्याशिवाय त्यावर सही करायची नाही, ही अशोकरावांची दुसरी सवय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बलाढय़ मंत्र्यांच्या फायलींवर मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयातून लवकर निर्णय होईनात तेव्हा फायली तुंबून राहतात, अशी सुरुवातीच्या काळात कुजबुज आणि कालांतराने उघड आरोप त्यांच्यावर होऊ लागले. मात्र काँग्रेस पक्षात राहूल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असा दोन्ही टोकांचा विश्वास संपादन करण्याची किमया अशोक चव्हाण यांना जमली आहे. त्यामुळेच तर त्यांच्यावर बिल्डरांशी संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतील एक गट चढवत असताना स्वत शरद पवार यांनी मात्र खडसेंना नुसतेच फटकारले नाही तर त्यांच्यावर तोडपाण्याचा आरोप करून खडसेंच्या आरोपातील पार हवाच काढून घेतली. सध्या राष्ट्रवादीतील बलाढय़ मंत्री असोत की काँग्रेसमधील विरोधक, अशोक चव्हाणविरोधी कारवायांना फारशी धार राहिल्याचे दिसत नाही. मात्र काँग्रेसी विरोधक हे कायम तेलात बुडवलेली वाळूच रगडतात. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांतून कधीना कधी तेल गळणार असा प्रत्येक विरोधी गटाचा प्रचंड विश्वास असतो. अशोक चव्हाण यांच्या विरोधकांच्या कारवायांना धार राहिली नसली तरी कारवाया थांबलेल्या नाहीत व थांबणारही नाहीत. काँग्रेसी गोटात अशोक चव्हाण विरोधकांची एकच जोरदार चर्चा सुरू आहे ती ही की, दिवाळीनंतर बघा.. काय बघा, काय होणार, याबद्दल काहीही सांगितले जात नाही. ‘व्हिस्परिंग कँपेन’साठी संघ परिवार पटाईत असल्याचे बोलले जाते. मात्र काँग्रेसांतर्गत होणारे ‘व्हिस्परिंग कँपेन’ संघ परिवारालाही लाजवेल या पद्धतीचे असते. त्यामुळे अशोक चव्हाण विरुद्ध पक्षांतर्गत विरोधक ही लढाई तर सुरूच राहणार, त्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि अगदी मनसेही त्यांच्या विरोधात लढाई तीव्र करणार या लढाईत अशोक चव्हाण नक्की काय करतात, कोणती रणनीती आखतात, यावर त्यांचे स्वतचे, राज्यातील काँग्रेस पक्षाचे व मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे भवितव्य ठरणार आहे.

जन्म : २८ ऑक्टोबर १९५८ (नांदेड)
भूषविलेली अन्य पदे
८ डिसेंबर २००८ पासून मुख्यमंत्री ’ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस
मार्च १९९३ ते मार्च १९९५ या काळात सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, संसदीय कार्य व गृह खात्यांचे राज्यमंत्री.
ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ पर्यंत महसूलमंत्री
जानेवारी २००३ ते ऑक्टोबर २००४ पर्यंत परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार खात्याचे मंत्री.
नोव्हेंबर २००४ ते डिसेंबर २००८ या काळात उद्योग, खाणकर्म, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार मंत्री.
राजकीय वारसदार
पत्नी अमिता चव्हाण या नांदेडमध्ये साखर कारखान्याच्या अध्यक्षा
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
८ डिसेंबर २००८ ते २६ ऑक्टोबर २००९
७ नोव्हेंबर २००९ पासून अजून पर्यंत पदावर आहेत.
पक्ष : काँग्रेस
१९८७ ते १९८९ नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड.
१९९२ ते १९९८ विधान परिषद आमदार
१९९९ पासून विधानसभेचे आमदार.

समर खडस,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०

सुशीलकुमार शिंदे (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)



..तर आता कहाणी सुशीलकुमार शिंदेंची. महाराष्ट्राच्या चौदाव्या मुख्यमंत्र्यांची.. महाराष्ट्राच्या तमाम मुख्यमंत्र्यांमधल्या सगळ्यात इंटरेस्टिंग कॅरेक्टरची.. सुशीलकुमारांचा शपथविधी झाला तेव्हा राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री म्हणून त्यांचे वर्णन केले गेले, पण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे तेवढे एकमेव वैशिष्टय़ नव्हते. बालवयामध्ये रस्त्यावर कधी काळी फुगे विकून मोठा झालेला पहिला मुख्यमंत्री, कोर्टात पट्टेवाला म्हणून काम केलेला पहिला मुख्यमंत्री, पहिला फौजदार मुख्यमंत्री, एवढेच कशाला, चेहऱ्याला भरपूर रंग लावून कधीकाळी नाटकात प्रत्यक्ष रमलेला पहिला मुख्यमंत्री बनण्याचा मानही त्यांच्याकडे जात होता.

पण त्यांच्या दलित असण्याचेच एवढे कौतुक झाले की, आपल्या बिरादरीतले कोणीतरी मुख्यमंत्री झाल्याचा आनंद साजरा करणे जिथे व्यावसायिक रंगककर्मीच विसरले, तिथे बाकीच्यांची काय कथा?
एक मात्र खरे की, सुशीलकुमारांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास स्वप्नवत वाटावा असाच झाला. मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने सुशीलकुमारांना जरी दीर्घकाळापासून पडत होती. तरीही प्रत्यक्षात मुख्यमंत्री बनून जेव्हा ते वर्षांवर राहायला गेले असतील तेव्हा त्यांनी स्वत:लाच एक चिमटा काढून हे स्वप्न खरोखर साकार झाले आहे ना, याची खात्री करून घेतली असेल. प्रतिकूलतेचा सामना करताना परिस्थितीशी फक्त लढून भागत नाही तर दुसरीकडे नियतीच्या खांद्यावर दोस्तीचा हात टाकून तिला आपलेसेही करून घ्यायचे असते, हे सुशीलकुमारांना बहुधा आपसूकच कळले होते. नशिबालाच आपलेसे करून घेतल्यावर यश तर मिळतेच पण नंतर लढाईचा शीण उरत नाही. मनात किल्मिषे राहात नाहीत. फक्त जिंकण्याचे समाधान आणि आनंद उरी भरून राहतो, याचे सुशीलकुमार आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास हे साक्षात उदाहरण आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शिंदेंचे नाव बऱ्याच काळापासून होते. पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी बारा-पंधरा वर्षे जावी लागली. या काळात त्यांच्या राजकारणाने उलटा-सुलटा, हवा तसा प्रवास केला, त्यांच्या गाडीने बऱ्याचदा रुळही बदलले, दिशा बदलली, गाडीतले सहप्रवासी बदलून टाकले, पण त्यातही हुशारी अशी की, प्रवास बिनबोभाट झाला. झालेला खडखडाट कुणाला फारसा कळलाही नाही.
१९७१ मध्ये पोलीस खात्यातून बाहेर पडून पूर्णवेळ राजकारणी बनण्याचा धाडसी निर्णय सुशीलकुमारांनी घेतला, तेव्हा त्यांची सारी भिस्त शरद पवार या समवयस्क तरुण नेत्यावर होती. १९७४ मध्ये करमाळ्याची पोटनिवडणूक जिंकेपर्यंत शरद पवार, गोविंदराव आदिक आणि सुशीलकुमार शिंदे या तिघांचा दोस्ताना कौटुंबिक पातळीवर पोहोचला होता. साहजिकच पवारांच्या चांगल्या-वाईट राजकारणात आदिक आणि शिंदे खंबीरपणे त्यांच्यामागे उभे राहात असल्याचे महाराष्ट्र पाहात होता. त्यामुळेच वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुरोगामी लोकशाही आघाडीचा घाट शरद पवारांनी घातला तेव्हा त्या कारस्थानात सुशीलकुमार शिंदेही तितक्याच अहमहमिकेने सामील झाले होते. दगाबाजीच्या त्या महानाटय़ातील शिंदेचे एक उपकथानक तेव्हा बरेच गाजलेही होते. शरद पवार काँग्रेसमधून फुटण्याची बातमी फुटली तेव्हा सुशीलकुमार पंढरपूरमध्ये होते. तेथे पत्रकारांनी त्यांना घेरले आणि तुम्ही आता काय करणार, असा प्रश्न विचारला. तेव्हा शिंदेंनी जोपर्यंत पंढरीतल्या विठोबाचे हात कंबरेवर आहेत, तोपर्यंत मी काँग्रेसमध्येच असेन, असे एकदम कडक उत्तर दिले होते. गंमत म्हणजे, त्याच रात्री ते पंढरपुरातून मुंबईला परतले आणि दुसऱ्या दिवशी पवारांच्या बरोबरीने खंजीर नाटय़ात सहभागी झाले आणि कॅबिनेट मंत्रीही बनले.
पुलोदचे हे सरकार पुढे बरखास्त झाले आणि नव्याने विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये अक्षरश: सावळा गोंधळ होता. कोण कोणाबरोबर आणि कोणत्या पक्षात आहे, हेही सांगणे महाकठीण झाले होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण या चौघांचाही परस्परांशी मेळ उरलेला नव्हता. इंदिरा गांधींशिवाय काँग्रेसची अवस्था काय होईल, याचे भान सगळ्यात आधी शंकरराव चव्हाणांना आले होते आणि त्यामुळे त्यांनी नासिकराव तिरपुडे, रामराव आदिक यांच्याप्रमाणेच इंदिरा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन टाकला होता. शरद पवारांच्या दगाबाजीने वसंतदादा अपमानित झाले होते आणि काय करावे अन् कुठे जावे या विवंचनेत ते बुडाले होते. पवारांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाणही तत्कालीन परिस्थितीपुढे असहाय झालेले दिसत होते आणि शरद पवार काँग्रेस (एस)मध्ये उरलेल्या सहकाऱ्यांसह महाराष्ट्र काबीज करण्याचे मनसुबे पाहात होते. सुशीलकुमार अर्थातच पवारांच्या कंपूत होते.
इंदिरा गांधींशिवाय तरणोपाय नाही, हा साक्षात्कार शंकररावांनंतर वसंतदादांना झाला आणि त्यांनी स्वत:ला काँग्रेसमध्ये विसर्जित करून टाकले. थोडय़ाच काळात यशवंतरावांनीही स्वत:ला काँग्रेसमध्ये ढकलून दिले. पण त्यांच्याही आधी, पुलोदच्या प्रयोगाला घरघर लागण्याची चिन्हे दिसू लागताच गोविंदराव आदिक आणि उदयसिंहराजे गायकवाड यांच्यासह सुशीलकुमार शिंदेही काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले. पवारांसारख्या जीवश्चकंठश्च मित्राला असे बाजूला सारण्याचा निर्णय शिंदेंनी का घेतला, त्यामागे नेमके काय कारण घडले, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. पण पवारांच्या नावाचा कपाळावर बसलेला शिक्का पुसून टाकण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असावे अशी एक शक्यता तेव्हा प्रामुख्याने बोलली जात होती. दुसरी शक्यता असलीच तर एवढीच की, मुख्य प्रवाहापासून अलगपणे पोहत राहिल्यास आपले राजकारण संपून जाईल, याची शिंदेंना झालेली जाणीव. राजकारणात दीर्घकाळ टिकण्यासाठी मैत्री कुर्बान करण्यावाचून सुशीलकुमारांसमोर पर्याय नव्हता. तो त्यांनी स्वीकारला. (तिसरी शक्यता तेव्हाच्या राजकीय वर्तुळात बोलली जायची ती सुशीलकुमारांविषयी पवारांनी केलेल्या एका कथित टिप्पणीची. पवारांच्या मंत्रिमंडळात सुशीलकुमार शिंदे कामगारमंत्री होते. कामगारांच्या कोणत्यातरी प्रश्नावरून त्यांचे पवारांशी बिनसले. त्यानंतर कुठेतरी खासगीत बोलताना पवारांनी म्हणे टिप्पणी केली की, हे कसले लेबर मिनिस्टर हे तर (प्रसूतीगृहाचे) लेबर वॉर्ड मिनिस्टर आहेत. या अत्यंत तिरकस आणि बोचऱ्या टोमण्याने दोघांच्या संबंधात बाधा आली, असे तेव्हा बोलले जात असे. पण ही पूर्णपणे ऐकीव माहिती आहे. त्यातले खरे-खोटे त्या दोघांनाच माहीत!) काहीही असो, शिंदेंच्या गाडीने यानिमित्ताने पुन्हा एकदा रूळ बदलले; रूळच नाही तर गाडीचा मुख्य चालकही बदलला आणि फारशा खडखडाटाशिवाय शरद पवारांना सोडून ती पुन्हा काँग्रेसच्या रुळावरून धावू लागली. श्रेष्ठींचे महत्त्व त्यांनी याच काळात जाणले.
सुशीलकुमार शिंदेंच्या जीवनपटावर धावती नजर फिरवली तर प्रकर्षांने जाणवणारी गोष्ट म्हणजे अवघड वाटावेत असे निर्णय त्यांना दर ठराविक टप्प्यावर घ्यावेच लागले. प्रत्येक वेळेला हा निर्णय घेताना त्यामध्ये मोठी जोखीम होती. पण या जोखिमेसकट त्यांनी धाडसी निर्णय घेतले, त्यासाठी सुस्थित आयुष्य डावाला लावले आणि दरवेळी त्यांचा निर्णय अचूकही ठरत गेला. अन्यथा रस्त्यावर फुगे आणि आईसफ्रूट विकणारा फाटका मुलगा कोर्टातली शिपायाची नोकरी मिळाल्यावर स्वस्थ बसला असता. शिंदे त्याला अपवाद ठरले. आयुष्यात स्थिरस्थावर होण्याची वेळ त्यांच्यावर जेव्हा जेव्हा आली तेव्हा नव्या क्षितिजाने त्यांना खुणावले आणि दरवेळी नव्या उत्साहाने शिंदे त्या दिशेने पळत राहिले. अस्थिरता ओढवून घेण्याचा हा प्रत्येक निर्णय त्या त्या वेळेला मोठा त्रासदायक ठरला असेल यात शंका नाही, पण अंत:प्रेरणेच्या बळावर ते तसे निर्णय घेत गेले. पवारांसाठी काँग्रेस त्यागण्याचा किंवा नंतर पवारांनाच वाऱ्यावर सोडून देऊन काँग्रेसमध्ये स्वगृही परतण्याचा निर्णय मात्र पूर्णपणे व्यावहारिक होता. हिशोबीपणातून घेतला गेलेला होता. त्यांचा मनातल्या प्रेरणेशी काही संबंध नसावा.
त्यामुळेच या हिशोबीपणाची त्यांना त्यावेळी भरपूर किंमत चुकवावी लागली. पुलोद सरकार बरखास्त झाल्यावर निवडणुका झाल्या तेव्हा शिंदे, गोविंदराव आदिक पवारांच्या काँग्रेसमधून निवडून आले. पण नंतर लगेचच त्यांनी पक्षांतर केले आणि ते इंदिरा काँग्रेसमध्ये दाखल झाले. पण तरीही त्यांच्याविषयी निष्ठावंतांच्या मनात शंकाच होत्या. मुख्यमंत्रीपदी असलेल्या बॅरिस्टर अंतुले आणि त्यांच्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या बाबासाहेब भोसलेंनी या पवारांच्या माणसांना सत्तेच्या बिलकूल जवळ येऊ दिले नाही. बाबासाहेबांनी तर सोलापूरच्या राजकारणातूनही शिंदेंना हद्दपार करण्याचा जणू चंगच बांधला होता. शिंदेंसारख्या प्रस्थापित नेत्यांना दूर ठेवून त्यांनी तरुण नेत्यांची स्वत:ची नवी टीम तयार केली. त्यामुळेच काही काळ सत्ता भोगलेल्या नेत्यांमध्ये दुखावलेपण वाढू लागले. बाबासाहेबांविषयी तक्रारी, कुरबुरी सुरू झाल्या. त्यांच्याविरोधात आवाज संघटित करणाऱ्यांमध्ये सुशीलकुमारही होते. पक्षातल्या विरोधकांच्या या कारवायांनी बाबासाहेब पुरते त्रासून गेले होते. त्यातूनच त्यांनी एकदा या पक्षांतर्गत विरोधकांची संभावना-भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची, अशा शेलक्या शब्दात केली. त्यांच्या या वक्तव्यानं विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला आणि संतापलेल्या भोसले विरोधकांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. नानाभाऊ एंबडवार यांनी हा ठराव मांडला आणि एरवी सौम्य स्वभावाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशीलकुमारांनी त्याला आक्रमक अनुमोदन दिले. पक्षातले आपले विरोधक षंढ आहेत, हे यांना (मुख्यमंत्र्यांना) कसे कळले, असा त्याच पातळीवरचा सवाल त्यांनी यावेळी केला होता. आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणण्याची देशातली ती पहिलीच घटना होती.
एकंदरीतच, बाबासाहेबांना त्यांची भाषा भोवली आणि ती दादांच्या पथ्यावर पडली. ते मुख्यमंत्री झाले. सुशीलकुमारांच्याही पथ्यावर पडली कारण दादांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री झाले आणि तब्बल नऊ वर्षे अर्थमंत्री राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात नऊ अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यामुळे शिंदेंच्या नावावर जमा झाला. मधल्या काळात आपल्यावर असलेला शरद पवारांचा ठसा पुसून टाकण्यात शिंदे पूर्णपणे यशस्वी झाले आणि पवारसमर्थक ऐवजी ते दिल्लीचे निष्ठावान म्हणून ओळखले जाऊ लागले. दिल्लीकरांचा कोणताही शब्द खाली पडू द्यायचा नाही, हे व्रत त्यासाठी शिंदेंना घ्यावे लागले. श्रेष्ठींनी दिल्लीला पक्षाचे सरचिटणीस म्हणून या असं सांगितल्यावर क्षणाचाही विलंब न करता राज्यातल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते दिल्लीला गेले. प्रदेशाध्यक्ष म्हणून मुंबईला जायला सांगितल्यावर सरचिटणीसपद सोडून मुंबईला आले. उपराष्ट्रपतीपदाची हरणारी निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने त्यांना मैदानात उतरवले तेव्हाही कसलेही आढेवेढे न घेता त्यांनी त्या अपयशाच्या विहिरीत स्वत:ला झोकून दिले.
शिंदेंच्या यशस्वी राजकारणामध्ये विश्वासूपणा या त्यांच्या गुणाचा खूप मोठा वाटा आहे, हे आता त्यांच्या राजकारणाचे पृथ:करण करताना लक्षात येते. पवारांशी बिनसल्यावर त्यांनी दिल्लीशी मनापासून जमवून घेतले. त्यामुळे ते राजीव गांधींच्या विश्वासातले झाले. नंतर नरसिंह रावांच्या जवळचे झाले आणि शेवटी सोनिया गांधींच्याही मर्जीतले. नरसिंह रावांशी जवळीक असलेले बाकीचे बहुतेक सगळे नेते सोनियांच्या काळात विजनवासात गेले. खुद्द नरसिंह राव शेवटच्या काळात एकाकी पडले. त्यांच्या कार्यकाळाचा भरपूर फायदा उठवलेल्या बहुतेक जणांनी नंतर रावांकडे पाठ फिरवली. सुशीलकुमार शिंदेंनी मात्र नरसिंह रावांना अंतर दिले नाही आणि त्यांनी रावांकडे ये-जा आहे म्हणून सोनिया गांधींनी त्यांच्या नावावर फुली मारली असेही कधी झाले नाही. ते आधी रावांच्या जवळचे होते, नंतर सोनिया गांधींच्याही जवळचे झाले. लोकसभा निवडणुकीवेळी सोनिया गांधींच्या अमेठी मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली ती याच जवळकीतून. राजीव गांधींचा शिंदेंवर असलेला विश्वास हे त्यामागचे कारण असू शकेल..
पण याच राजीव गांधींमुळे सुशीलकुमारांचा एकदा मुखभंग झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पवारांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविण्याच्या सूचना श्रेष्ठींकडून मिळाल्यावर विलासराव देशमुख, रामराव आदिक अशा निष्ठावंतांबरोबर शिंदेही मुख्यमंत्री हटाव मोहिमेत सक्रियपणे सामील झाले. विलासराव आणि सुशीलकुमार यांचा दोस्ताना याच काळात जमला. आमची मैत्री म्हणजे दो हंसो का जोडा असे हे दोघेही जण याच काळात सांगू लागले. आमच्यापैकी कुणालाही मुख्यमंत्री करा, पण आता या पवाररुपी बदकाला बदला असा या दोन हंसांचा आग्रह होता. गंमत म्हणजे हे दोन्ही हंस नंतर एकमेकांना हटवून मुख्यमंत्री झाले, पण त्यांच्या परस्परांबद्दल माना वाकडय़ा झाल्या त्या झाल्याच.
पण ही वेळ येईपर्यंत अनेक वर्षे हे दोन्ही नेते एकमेकांना साथ देत राहिले. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नावे चर्चेत येत राहिली आणि दरवेळी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचे सूचक, अनुमोदक बनत पदरात आलेली निराशा दोघे लपवत राहिले. नरसिंह राव काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर त्यांना स्वत:ची टीम तयार करायची होती. त्यासाठी त्यांनी शिंदेंना दिल्लीला बोलावून घेतले. शिंदे आणि राव दोघेही साहित्य, संस्कृतीत रमणारे. मराठी साहित्यिक वर्तुळात एवढी उठबस असणाऱ्या नेत्यांत यशवंतराव, शरद पवारांनंतर सुशीलकुमारांचाच नंबर लागेल. रावांच्या इच्छेनुसार शिंदे दिल्लीत आले आणि प्रमोद महाजनांप्रमाणेच उत्तमरीत्या रमले. त्या काळात अकबर रोडवरच्या काँग्रेस मुख्यालयात शिंदेंच्या ऑफिसबाहेर नेहमी प्रचंड गर्दी असे. देशभरातील गोरगरीब माणसे साधीसुधी कामे घेऊन दिल्लीच्या उंबरठय़ावर आदळतात आणि याची त्याची चिठ्ठी मिळाल्यावर काम होण्याची आस बाळगतात. अशा लोकांना शिंदे हे मोठे आधार वाटत. शिंदे स्वत:देखील ती गर्दी एन्जॉय करत. शिवाय दिल्लीत बसून नेटवर्किंगही चांगले करता येत होते. श्रेष्ठींसोबत उठबस वाढत होती. जातीचे पाठबळ नसलेल्या शिंदेंसारख्या नेत्याला त्यामुळेच महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वगैरे बनण्यासाठी परतण्याची इच्छा नव्हती. गंमत म्हणजे, महाराष्ट्रातल्या ज्या नेत्यांना शिंदे दलित असल्याने मुख्यमंत्रीपदी नको होते, त्यांना प्रदेशाध्यक्षपदी मात्र सर्वाना बरोबर घेऊन चालणारे शिंदेच हवे होते. मराठा नेत्यांचा हा दुटप्पीपणा शिंदेंना धुमसायला लावत असे. आजही या स्थितीत बदल झाला असेल असे वाटत नाही.
पुढे रावांच्याच इच्छेनुसार शिंदे महाराष्ट्रात आले. पक्षाचे जमेल तेवढे काम त्यांनी केले आणि पहिली संधी मिळाल्यावर पुन्हा दिल्लीत परतले. मधल्या काळात महाराष्ट्रात पुन्हा सत्तापालट झाला होता. सेना-भाजपाकडून सत्ता पुन्हा काँग्रेसच्या हातात आली होती. दो हंसो का जोडामधील जोडीदार हंस म्हणजे विलासराव देशमुख तळ्यात मळ्यात करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्यात यशस्वी ठरले.
खरे तर, मुख्यमंत्री बनण्यासाठी शिंदेंसाठी ही वेळ एकदम अनुकूल होती. शिवसेना-भाजपा सरकारने मुदतपूर्व निवडणुका घेतल्या तेव्हा प्रतापराव भोसले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्यावरून पवारांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता आणि सहा महिन्यांच्या आत निवडणुका झाल्या होत्या. फार कमी जणांना आठवत असेल की, सोनियांचा पराकोटीचा विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून राज्यात सत्ता मिळवावी. या काँग्रेसच्या भूमिकेचा सर्वात पहिल्यांदा उच्चार सुशीलकुमार शिंदेंनीच जाहीरपणे केला होता. त्यांच्या शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या बाजूने सर्वात आधी अनुकूलता दाखवली होती. विशेष म्हणजे, हे दोन नेते एकत्र येण्याची भूमिका मांडत होते, तेव्हा मतमोजणीची प्रक्रिया पूर्णपणे संपलेलीही नव्हती. अनेक ठिकाणचे निकाल देणे बाकी होते. असे म्हणतात की, त्यावेळी शरद पवारांची इच्छा सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापले जावे अशीच होती. शिंदेंनीही दोन्ही बाजूंचा पाठिंबा आपल्याला मिळेल या हिशोबानेच एकत्र येण्याचा फॉम्र्युला शोधून काढला होता. पण शिंदे मुख्यमंत्री होण्याला पवारही अनुकूल असल्याचे लक्षात आल्याबरोबर काँग्रेसचे निरीक्षक म्हणून आलेल्या माधवराव शिंदेंनी विरोधी भूमिका घेतली. नवा मुख्यमंत्री पवार विरोधकच असला पाहिजे आणि तो मराठा समाजातलाच असला पाहिजे, असा निर्णय त्यांनी श्रेष्ठींच्या गळ्यात उतरवला आणि त्याला अनुसरून विलासराव देशमुखांचे नाव नवनिर्वाचित आमदारांच्या तोंडून अक्षरश: वदवून घेतले. झाल्या प्रकाराबद्दल मनात कुढत राहणे तेवढे सुशीलकुमारांच्या वाटय़ाला आले.
राष्ट्रवादीशी सोयरिक जुळवून सत्तेवर आलेल्या विलासरावांच्या सरकारला नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर नवनव्या संकटांचा सामना करावा लागू लागला. निष्क्रीयतेसाठी रोजच्या रोज फटके पडू लागले. आपापसातल्या हमरीतुमरीने सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव निर्माण झाले. तेलगी प्रकरण, एन्रॉनची भानगड, घटक पक्षांचे मानापमान, झोपडय़ा हटविण्याच्या मुद्दय़ांचे झालेले राजकारण अशा एकापाठोपाठ एक आलेल्या वादळांमध्ये विलासरावांची नौका हेलकावे खावू लागली. श्रेष्ठींची मर्जी खप्पा होऊ लागली. किती निष्क्रीय ठरला तरी मुख्यमंत्री बदलायचा नाही, ही खरे तर तोवर सोनिया गांधींची नीती ठरून गेली होती. पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यातले मुख्यमंत्री अपयशी आणि आपापल्या राज्यात अप्रिय ठरले असले तरी बदलले गेले नव्हते. महाराष्ट्राचा मात्र अपवाद केला गेला. कारण विलासराव ढिम्म आहेत, बेफिकीर आहेत आणि राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्यांपुढे हतबल ठरले आहेत, अशी श्रेष्ठींची भावना झाली होती. त्यामुळे मुलाच्या सिनेमाच्या प्रीमिअरला जातीने हजर राहण्याचे आणि त्यासाठी सरकारी यंत्रणा राबविल्याचे फुटकळ निमित्त करून विलासरावांना हटविण्याचा निर्णय झाला.
विलासरावांचा उत्तराधिकारी म्हणून सुशीलकुमारांचे नाव येणे अगदीच अपरिहार्य होते. त्यांच्याशिवाय स्पर्धेमध्ये रोहिदास पाटील आणि पतंगराव कदम यांची नावे होती. बाकीही काही नावे होती; पण सगळी इच्छुकांनी स्वत:च मीडियात पेरलेली. रोहिदास दाजींचा वारू मात्र त्या वेळी फारच उधळलेला होता. त्यांच्या महत्त्वाकांक्षा तेव्हा एवढय़ा बळावल्या होत्या, की त्यांना चाप लावणे हे सुशीलकुमारांसमोरचे सगळ्यात पहिले आव्हान होते. मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने रंगविणाऱ्या आणि श्रेष्ठींशी आपली जवळीक असल्याचा प्रचार करणाऱ्या रोहिदास दाजींचा सुशीलकुमारांनी जबरदस्त गेम केला. विलासरावांच्या मंत्रिमंडळातल्या या पॉवरफूल मंत्र्याला त्यांनी चक्क घरी बसविले. श्रेष्ठींच्या नावाने महाराष्ट्रात स्वत:ची हवा करणाऱ्या दाजींना दिल्लीत काडीचीही किंमत नाही आणि ते स्वत:चे मंत्रीपदही वाचवू शकले नाहीत, हा सगळ्याच राजकीय पंडितांना मोठा धक्का होता. दाजींच्या राजकारणाला तिथून जे ग्रहण लागले ते लागलेच.
मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमारांना साधारण पावणे-दोन वर्षांचा कालखंड मिळाला. बारा वर्षांच्या कालावधीनंतर शिंदे मंत्रालयात परतले; पण मधल्या काळात सगळेच बदलून गेले होते. नोकरशाहीची कामाची पद्धत, राजकारण्यांची, लोकप्रतिनिधींची वागण्याची पद्धत सगळेच बदलून गेले होते. त्याच्याशी जमवून घेता घेता सुशीलकुमारांची दमछाक होऊ लागली. सुरुवातीच्या काळात तर बऱ्याच गोष्टींची, बदललेल्या संदर्भासह त्यांना माहितीच नाही, असे निदर्शनाला येई. बघतो, माहिती घेतो, पाहावे लागेल.. अशा टाईपची उत्तरे त्यावरून सत्ताधारी आमदार त्यांची कोंडी करू पाहात. पक्षातल्या नाराज नेत्यांची अर्थातच अशा आमदारांना फूस असे. एकदा अशाच एका मुद्यावरून शिंदे एवढे भडकले की, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली. दिल्लीकरांनी सांगितले म्हणून मी मुंबईत आलोय, त्यांनी सांगितले तर या क्षणी पुन्हा दिल्लीला जायला मी तयार आहे, असे अगदी निर्वाणीच्या शब्दात ते बोलू लागले.
हसतमुख नेता अशी ख्याती मिळवलेल्या सुशीलकुमारांचे हास्य या काळात बऱ्याच अंशी मावळले. त्यांना पहिला झटका मिळाला तो लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये. मुख्यमंत्र्यांच्या सोलापुरात लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली आणि त्यामध्ये आनंदराव देवकाते या शिंदेंच्या विश्वासू नेत्याला दारुण पराभव पत्करावा लागला. विजयसिंह मोहिते पाटील यांचे भाऊ असलेल्या प्रतापसिंह मोहिते पाटलांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवून देवकातेंना पाणी पाजले आणि सुशीलकुमारांच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे काढले. अडखळत मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या आणि सगळ्यांशी जमवून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिंदेंच्या आत्मविश्वासाला हा पराभवाने मोठाच हादरा दिला. स्वत:च्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना किती किंमत आहे, हे जगासमोर आले.
शायनिंग इंडियाचा नारा याच काळात देशभर घुमू लागला होता. केंद्रातल्या भाजपा सरकारचे अश्व आत्मविश्वासाने फुरफुरत होते आणि त्यांना पाहून राज्यातल्या तट्टाण्याही नाचू लागल्या होत्या. त्यांच्या आक्रमकतेपुढे राज्यातले सरकार दुबळे आणि अवसानघातकी वाटू लागले होते. त्याच वेळी लोकसभेच्या निवडणुका आल्या. सोलापुरातून कोण निवडणूक लढणार असा भला-थोरला प्रश्न निर्माण झाला. देवकातेंच्या पराभवाने झालेले हसे टाळण्यासाठी सुशीलकुमारांना आपल्या पत्नीलाच निवडणूक रिंगणात उतरण्याचा आग्रह झाला ते ही या मोहात पडले. हा मोह अडचणीत आणणार हे ठाऊक असूनही त्यांना त्या जाळ्यात अडकले. शेवटी व्हायचे तेच झाले. सोनिया गांधी आणि शरद पवारांनी संयुक्त प्रचाराचा नारळ सोलापूरच्या सभेत, उज्ज्वला शिंदेंसाठी फोडला. पण त्यामुळे शिंदे दाम्पत्याच्या पदरात यशाचे माप काही पडले नाही. मुख्यमंत्री आपल्या पत्नीलाही निवडून आणू शकत नाहीत, हा मुद्दा फार ताणला गेला. काही कारणाने केंद्रात सत्तापालट झाला होता आणि राज्यातही काँग्रेसची कामगिरी फारशी वाईट नव्हती.
सगळीकडून कोंडी केली जात असल्याने एक हतबल मुख्यमंत्री म्हणून स्वत:ची इमेज होते आहे, हे शिंदेंच्या लक्षात आले आणि त्यांनी अखेरच्या षटकांमध्ये खेळायला आलेल्या क्रिकेटपटूंप्रमाणे धडाक्याने काम करायला सुरुवात केली. पण ही कामे दिखाऊ स्वरूपाची नव्हती. त्यामुळे त्यांचा फारसा गवगवा झाला नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प. वैदू, माकडवाले अशांसाठी योजना आखल्या गेल्या. काँग्रेसची हरवत चाललेली व्होट बँक भक्कम करण्यावर त्यांनी प्रामुख्याने भर दिला आणि दलित व मुस्लिम काँग्रेसबरोबर राहतील हे पाहिले. महिला, विद्यार्थी, झोपडय़ांमध्ये राहणारे अशा उपेक्षितांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न शिंदेंच्या सरकारने मनापासून केला. त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये दिसला. कोणालाही अपेक्षित नसलेले काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आलेले देशाने पाहिले. पण या यशानंतर त्याची फळे चाखण्याचे भाग्य काही त्यांना मिळाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा येणार असली तरी राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या, मराठा समाज काँग्रेसपासून दुरावला, शिंदे राष्ट्रवादीच्या आणि पवारांच्या फार आहारी गेले, अशा प्रकारच्या चर्चा मुंबईत आणि दिल्लीत रंगू लागल्या. त्या घडवून आणण्यात दो हंसो का जोडा फेम विलासराव देशमुखच आघाडीवर राहिले आणि दिल्लीत पद्धतशीर लॉबिंग करून ते पुन्हा मुख्यमंत्रीही झाले. विलासरावांच्या नावाची घोषणा निरीक्षकांनी केली तेव्हा बराच काळ सुशीलकुमारांचा स्वत:च्या कानावर विश्वास बसला नव्हता. विलासरावांनी आपला असा गळा कापावा याचे कमालीचे वैषम्य सुशीलकुमारांना त्यावेळी होते. ते एवढे टोकाचे होते, की सोलापुरात एके ठिकाणी बोलताना त्यांनी आपल्याला गवतातला हिरवा साप दिसला नाही, अशा शब्दांत आपल्या मनातली खदखद बोलून दाखविली होती.
पण एकंदरीत सुशीलकुमारांच्या बाबतीत असे प्रसंग विरळाच. ते कधी लढलेही नाहीत आणि कधी रडलेही नाहीत. ठेविले हाय कमांडे तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान हा मूलमंत्र त्यांनी स्वत:पुरता मनापासून जपला आणि राजकारणात यशस्वी झाले. त्यांनी कधीही कोणत्याही प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली नाही. कोणत्याही वादग्रस्त विषयामध्ये पडून स्वत:ची गोची करून घेतली नाही. जेव्हा जेव्हा वादाचे प्रसंग आले तेव्हा ते त्यापासून चार हात लांब राहिले आणि त्याचमुळे सगळ्यांशी मैत्रीचे संबंध राखू शकले. राज ठाकरेंच्या आक्रमक मराठीपणाबद्दल शिंदेंची भूमिका काय? शिवसेनाप्रमुखांना भुजबळांनी अटक केली, त्याबद्दल त्यांचे मत काय? ओबीसी आरक्षणाबद्दल त्यांना काय वाटते? अशा प्रश्नांबद्दलच्या शिंदेंच्या भूमिका आपल्याला कधीच आठवत नाहीत. कारण तशा भूमिका घेणे सुशीलकुमारांनी आजवर मोठय़ा चतुराईने टाळले. सगळ्यांशी छान जमवून आनंदाचे, गोडीगुलाबीचे राजकारण ते मनापासून करीत राहिले. साहित्यिकांच्या बैठका आणि कवितांच्या मैफिलींमध्ये रमत राहिले. कोणाशी वैरभाव जपायला नको, कुणाला अंगावर घ्यायला नको आणि कुणाची उगाच कुरापतही काढायला नको, असे आपले हे मध्यमवर्गीय पापभिरू राजकारण.. आक्रमक राजकीय लढाई, अशी त्यांनी कधी केलीच नाही. या अतिसावध भूमिकेमुळेच असेल कदाचित, त्यांच्या हक्काचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडून हिरावून घेतले गेले, तेव्हा त्यांच्यावर धडधडीत अन्याय होतोय, असे महाराष्ट्राच्या जनतेलाही प्रकर्षांने जाणवले नाही.
(लेखक स्टार माझा या वाहिनीचे मुख्य संपादक आहेत)

जन्म : ४ सप्टेंबर १९४१ (परांडा)
भूषविलेली अन्य पदे
राज्यमंत्रिमंडळात वित्त, नगरविकास, उद्योग, समाजकल्याण, परिवहन, सांस्कृतिक कार्य, विधी व न्याय, आरोग्य.
केंद्रात उर्जा खाते ’ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व अ. भा.काँग्रेसचे सरचिटणीस ’ आंध्र प्रदेशचे राज्यपाल.
राजकीय वारसदार
कन्या प्रणिती शिंदे या आमदार ’ जावई राज श्रॉफ हे मुंबई काँग्रेसच्या उद्योग विभागाचे अध्यक्ष
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
१८ जानेवारी २००३ ते ३१ ऑक्टोबर २००४
पक्ष : काँग्रेस
१९७३ मध्ये करमाळा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विधानसभेत पहिल्यांदा निवड

राजीव खांडेकर,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०

विलासराव देशमुख (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)



महाराष्ट्राच्या अग्रणी राजकीय नेत्यांमध्ये विलासराव देशमुख यांची गणना होते. हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तिमत्व, संयमी स्वभाव, धूर्त व मुरब्बी बाणा, हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य अशा वैशिष्टय़ांमुळे विलासरावांभोवती लोकप्रियतेचे वलय आणि चाहत्यांचे वर्तुळ निर्माण झाले. बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री आणि राज्याचे दोनदा मुख्यमंत्री अशा ३५ वर्षांंतील सातत्यपूर्ण राजकीय प्रवासातून अनेक दिग्गज नेत्यांना मागे टाकत विलासरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत वसंतराव नाईक यांच्याखालोखाल सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान विलासरावांनाच लाभला आहे. ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ आणि नोव्हेंबर २००४ ते डिसेंबर २००८ अशा दोन टप्प्यांमध्ये ८८ महिने मुख्यमंत्रीपद भूषविताना विलासरावांना महाराष्ट्रावर आपल्या राजकारणाचा खोलवर ठसा उमटविणारे शरद पवार यांच्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणून नऊ महिने जास्त मिळाले. पण कुठल्याही मुख्यमंत्र्याचे मूल्यमापन त्याची कारकीर्द महिन्यांत किंवा वर्षांंत मोजून होत नाही. तुलनेने अल्पकाळ मुख्यमंत्रीपद वाटय़ाला येऊनही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत संस्मरणीय कामगिरी कशी बजावता येते, हे यशवंतराव चव्हाण किंवा वसंतदादा पाटील यांच्यासारख्या द्रष्टय़ा आणि धाडसी मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. या दिग्गजांच्या फूटपट्टीवर विलासरावांची कारकीर्द मोजायची झाल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोणते कर्तृत्व बजावले, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
विलासराव देशमुख ऑक्टोबर १९९९ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाची राजकीय स्थिती सर्वस्वी भिन्न होती. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा जबरदस्त हादरा बसला होता. काँग्रेसच्या देशव्यापी पीछेहाटीची ती नांदीच ठरली होती. विलासरावांचीही अवस्था काँग्रेससारखीच होती. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर बंडखोरी करून विधान परिषदेची निवडणूक लढण्याचा जुगार विलासरावांच्या अंगलट आला आणि अध्र्या मताने झालेल्या आणखी एका पराभवासह त्यांनी राजकीय वनवास ओढवून घेतला होता. १९९९ साली लोकसभेसोबत महाराष्ट्राचीही विधानसभा निवडणूक होत असताना पवारांनी अपशकुन घडविल्यामुळे विदेशी वंशाच्या खडकावर आपटून काँग्रेसच्या जहाजाचे महाराष्ट्रात दोन तुकडे झाले. विलासरावांपुढे स्वतच्या राजकीय पुनर्वसनाची विवंचना होती, तर सोनियांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसपुढे अस्तित्वाचा निकराचा संघर्ष. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याची संधी चालून येईल, असा विचार विलासरावांच्या मनात चुकूनही डोकावणे शक्य नव्हते. राज्यात शिवसेना-भाजप युतीचेच सरकार येणार असेच सर्वांनी गृहित धरले होते. पण साडेचार वर्षांंच्या राजवटीत राज्यावर ४० हजार कोटींच्या ओझे लादणाऱ्या युतीला बहुमताने हुलकावणी दिली. तरीही सत्तेची समीकरणे काँग्रेसला अनुकूल नव्हती. राज्यात कोणाची सत्ता येणार या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत विलासराव देशमुख यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती. काँग्रेसला सत्तेत परतण्याची शक्यता नसल्यामुळे किमानपक्षी विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याची संधी मिळेल या आनंदात विलासराव होते. त्यानंतरच्या वेगवान राजकीय घटनाक्रमात पाच महिन्यांपूर्वी दुभंगलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हातमिळवणी करणे भाग पडले. सहा धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ लाभल्याने संख्याबळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पारडे जड झाले. राज्याच्या राजकारणातील विलासराव आणि काँग्रेसचा वनवास एकाचवेळी संपला. शेवटची घरघर लागलेल्या काँग्रेसला मोक्याच्या क्षणी महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्याने संजीवनी दिली. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे वाईट दिवस संपण्याची सुरुवात तिथूनच झाली.
काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकाचवेळी किमान तीन आघाडय़ांवर लढावे लागते. आक्रमक विरोधी पक्षांच्या तोफखान्याला त्यांना सामोरे जावे लागते. त्याचवेळी पक्षांतर्गत विरोधकांना नामोहरम करून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची शाबूत ठेवावी लागते. खुर्ची जात नाही, अशी खात्री पटल्यानंतरच काँग्रेसचे मुख्यमंत्री फावल्या वेळात राज्याच्या समस्यांकडे लक्ष देऊ शकतात. मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या इनिंगमध्ये विलासरावांना अशा सर्वच आघाडय़ांवर संघर्ष करावा लागला. अनपेक्षितपणे गमावलेली सत्ता परत मिळविण्यासाठी इरेला पेटलेले विरोधक, आठ पक्षांच्या धर्मनिरपेक्ष आघाडीचे निसटते बहुमत, महत्त्वाची खाती पटकावून सत्तेतील भागीदारीची पुरेपूर किंमत वसूल करताना कुरघोडीची एकही संधी न सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहकारी आणि दिल्लीतील हायकमांडकडे सतत तक्रारींचा पाढा वाचणारे पक्षांतर्गत स्पर्धक अशा विविध आघाडय़ांवर अन्य कोणत्याही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याप्रमाणे विलासरावांनाही लढावे लागत होते. त्यातच भाजप-शिवसेना युती सरकारने उभा केलेला कर्जाचा डोंगर आणि जबरदस्त वीजटंचाईसारख्या उग्र समस्यांनी राज्याच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह लागले होते. पण या सर्व संकटांना तोंड देत विलासरावांनी आपली खुर्ची तब्बल ३९ महिने टिकवून ठेवली. एवढेच नव्हे तर बाजारात पत गमावलेल्या महाराष्ट्राला दिवाळखोरीतून बाहेर काढत आर्थिक स्थैर्याकडे नेले. औद्योगिक विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राची घसरलेली गाडी बऱ्यापैकी पूर्वपदावर आली. विलासरावांच्या पहिल्या इिनगचे हेच वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
भाजप-शिवसेना युतीची साडेचार वर्षांंची सत्ता अकस्मात संपल्यानंतर विलासरावांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने राज्याचे मर्यादित उत्पन्न आणि ‘तिजोरीच्या खडखडाटा’वर निर्धाराने मात केली. घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि त्यावरील वर्षांकाठी साडेपाच हजार कोटींचे व्याज फेडण्यासाठी शासनाला नवे कर्ज घ्यावे लागत होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंधरा दिवसातच विलासरावांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या बोनसपासून वंचित ठेवण्याचा कटु निर्णय घ्यावा लागला आणि बिगरयोजना खर्चाला लगाम लावणे भाग पडले. त्याचवेळी काठावरच्या, निसटत्या बहुमताने सरकार चालवितानाही त्यांची कसोटी लागत होती. देशमुख सरकार आठ दिवसात जाणार, पंधरा दिवसात जाणार अशा सेना-भाजपच्या गोटातून मिळणाऱ्या धमक्यांमुळे आघाडी सरकारवर अविश्वासाची कायमची टांगती तलवार होती.
निधीअभावी अर्धवट अवस्थेतील कृष्णा खोरे प्रकल्पांना मार्गी लावणे, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या विकासाचा बॅकलॉग दूर करण्यासाठी १९९४ च्या वाढलेल्या किंमतींचा आधार मानणे अशा निर्णयांनी विलासरावांच्या सरकारने राज्याचा थांबलेला विकास सुरु करण्याचा प्रयत्न केला. विदर्भ आणि नागपूर शहराला झुकते माप दिले. कापसाला २१०० रुपये भाव देण्याचा निर्णय घेताना एकाधिकार कापूस खरेदी योजना जाणीवपूर्वक शिथिल केली. विदर्भातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांकडे लक्ष दिले. मराठवाडय़ात प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालय चौपदरी रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय घेतला. गोदावरी आणि मांजरा नदीवर बंधारे बांधण्याची कामे हाती घेतल्याने मराठवाडय़ात ऊसाचे क्षेत्र वाढून साखरेचा उद्योग विस्तारला. अर्थसंकल्पात मागासवर्गीय, आदिवासींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. एन्रॉनचा महागडा वीजखरेदी करार मोडण्याचा कणखरपणाही त्यांनी दाखविला आणि शरद पवारांचा विरोध डावलून एन्रॉनच्या चौकशीसाठी माधव गोडबोले यांना नेमले. एका बाजूला सरकार टिकविणे आणि सरकार चालविणे असे दुहेरी आव्हान पेलत त्यांनी स्वतच्या सरकारला आणि महाराष्ट्राला स्थैर्याच्या दिशेने नेले. एकीकडे शरद पवार यांचा विरोध पत्करत असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते नारायण राणे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते नितीन गडकरींच्या सरकार पाडण्याच्या रणनितीला शह देण्यासाठी त्यांना सदैव सतर्क राहावे लागत होते. शेकापचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यामुळे सरकार अस्थिर झाले आणि १३ जून २००२ रोजी विलासरावांच्या सरकारला विश्वासमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले. पण शेकापच्या आमदारांना ‘तटस्थ’ होण्यास बाध्य करीत विलासरावांनी सरकार शाबूत ठेवले आणि राणे-गडकरींविरुद्ध महत्त्वाची बाजीजिंकली. त्यानंतर आघाडीचे सरकार पाडण्याच्या फंदात विरोधक पडले नाहीत. पण विरोधकांना पुरून उरणाऱ्या विलासरावांना सात महिन्यांनंतर, २००३ च्या संक्रांतीच्या मोसमात पक्षांतर्गत सत्तासंघर्षांमुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. त्यांची जागा सुशीलकुमार शिंदेंनी घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा केंद्रिबदू लातूरपासून सव्वाशे किलोमीटरवर असलेल्या सोलापूर शहराकडे सरकला. चार महिन्यांनंतर सोनिया गांधींनी विलासरावांचे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करून ‘पुनर्वसन’ केले. छत्तीसगढ, गुजरातचे प्रभारीपद सोपवून त्यांना व्यस्त करण्याचा प्रयत्न केला. पण दिल्लीत विलासरावांचे मन रमलेच नाही. गमावलेले मुख्यमंत्रीपद परत मिळविण्याच्या इर्षेने त्यांनी दीड वर्ष दिल्लीत मोर्चेबांधणी केली. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सोनिया गांधींची जादू चालली आणि दिल्लीतील वाजपेयी सरकार हादरले. काँग्रेसचे केंद्रात पुनरागमन झाल्यानंतर विलासरावांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसभांनी महाराष्ट्र िपजून काढला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दुसऱ्यांदा सत्तेत आली. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त जिंकणाऱ्या राष्ट्रवादीशी काँग्रेसची मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली. तीन अतिरिक्त कॅबिनेट मंत्रीपदे मिळवून राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला. शिंदेंवर शेवटच्या क्षणी मात करून पुन्हा विलासरावांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद खेचून आणले. आपली गच्छंती आणि पुनरागमन या दोन्ही गोष्टी दिल्लीतील हायकमांडच्या इच्छेनेच झाल्या, असे विलासराव सांगतात.
मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विलासरावांनी काय केले, हा वादाचा विषय ठरला आहे. दिल्लीतील हायकमांडच्या लहरीपणामुळे मुख्यमंत्रीपद कधीही गमवावे लागेल याची पुरेपूर जाणीव विलासरावांना झाली होती. राज्यातील अन्य बडय़ा राजकीय नेत्यांची उदाहरणे त्यांच्या डोळ्यापुढे होती. त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये ४९ महिन्यांचा मोठा कार्यकाळ लाभूनही राज्यापुढच्या समस्या गांभीर्याने सोडविण्याऐवजी विलासराव आत्ममग्न राहिले, हा त्यांच्या विरोधकांचा आरोप अनाठायी वाटत नाही. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेला महापूर, ११ जुलै २००६ रोजी लोकलगाडय़ांमध्ये झालेली भीषण बॉम्बस्फोट मालिका, राज्याला भेडसाविणारी साडेपाच हजार मेगाव्ॉटची भीषण वीजटंचाई, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलितांना अस्वस्थ करणारे खैरलांजी हत्याकांड, मुंबई-पुणे-नाशिक भागात राज ठाकरेंच्या मनसेने उत्तर भारतीयांविरुद्ध सुरु केलेले िहसक आंदोलन यासारख्या सततच्या नकारात्मक घटनांमुळे महाराष्ट्राची देशभर नाचक्की झाली. राज्यावर अशी संकटे ओढवत असताना विलासरावांचे नेतृत्व अलिप्त भासत होते. २६ जुलैच्या महापुरात रस्त्यावर उतरून मुंबईकरांना धीर देऊ शकले नाही म्हणून त्यांच्यावर टीका झाली. राज ठाकरेंच्या आंदोलनाला वेसण घातली नाही, श्रीकृष्ण आयोग अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी केली नाही म्हणून दिल्लीतील श्रेष्ठींचा रोष त्यांनी ओढवून घेतला. या सर्व घटनांची संवेदनशीलपणे दखल घेऊन विलासरावांना त्यांच्यातील कणखर प्रशासक दाखवून देता आला असता.
अस्थिर राजकारणाच्या खेळपट्टीवर चाचपडत खेळून जम बसविण्यात पहिली इनिंग घालविल्यानंतर विलासरावांना मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शतक ठोकायचे होते. विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे छोटय़ा पक्षांच्या डोकेदुखीला त्यांना सामोरे जावे लागणार नव्हते. सलग दुसऱ्या पराभवाच्या दणक्यामुळे विरोधी पक्षही खचले होते. महाराष्ट्रात राजकीय आणि आर्थिक स्थैर्य प्रस्थापित झाल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून विलासरावांचा अजेंडाही बदलला होता.
विलासरावांनी दुसऱ्या इनिंगमध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूरसारख्या राज्यातील मोठय़ा शहरांमधील पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य देण्याचे ठरविले. बकाल झालेले मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. १९९५ पर्यंतच्या झोपडपट्टय़ा नियमित करून उर्वरित झोपडपट्टय़ांना हटविण्याच्या त्यांच्या मोहीमेत मुंबईतील काँग्रेसचेच नेते आडवे आले. एवढे करूनही या नेत्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देता आला नाहीच. मुंबईचे शांघाय करण्याची पंतप्रधान मनमोहन सिंग यांची घोषणाही त्यामुळे हवेतच विरली. मुंबईत रातोरात झोपडय़ा घालून अनधिकृतपणे राहता येणार नाही आणि तसे करणे हा दखलपात्र गुन्हा ठरेल, असा कायदा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पण व्होटबँकेच्या राजकारणापुढे हा कायदा क्षीण ठरला. शहरी समस्यांची जाण असलेले मनोहर जोशी-नारायण राणे सोडल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईवर अन्यायच केला हा समज दूर करण्यासाठी विलासरावांनी मुंबईचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक प्रकल्प हाती घेतले. मुंबईच्या ड्रेनेज व्यवस्थापनासाठी केंद्राकडून १२५० कोटी रुपये आणले. चौदा पदरी वेस्टर्न हायवेचे काम हाती घेतले. ईस्टर्न हायवेच्या कामाचीही सुरुवात केली. मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेऊन सोनिया गांधींच्या हस्ते ५२ हजार गाळ्यांचे वाटप केले. दिल्लीप्रमाणे मुंबईतही मेट्रो रेल्वे प्रकल्प आणला आणि घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोचे मनमोहन सिंग यांच्या हस्ते भूमिपजून केले. मेट्रो रेल्वेच्या स्थानकांना जोडण्यासाठी मोनो रेल प्रकल्पही त्यांनी सुरु केला. अनेक ठिकाणी फ्लायओव्हर्स आणि स्कायवॉक बांधले. लोकल गाडय़ांची वाहतूक बळकट करण्यासाठी एमयुटीपी १ आणि २ प्रकल्पांतर्गत राज्य व केंद्राच्या ५०-५० टक्के खर्चाने १२ डब्यांच्या १५५ नव्या एअरकुल्ड गाडय़ा आणल्या आणि रेल्वे ट्रॅक वाढविण्याचे काम सुरु केले. माहितीच्या अधिकाराचा कायदा, सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, शेतकऱ्यांना २५ हजारापर्यंत बिनव्याजी कर्ज, महिला बचत गटांना ४ टक्क्यांनी कर्ज, सच्चर समितीच्या शिफारशींनुसार अल्पसंख्यकांच्या आर्थिक उत्थानासाठी स्थापन केलेले स्वतंत्र मंत्रालय, मोठय़ा प्रमाणातील परदेशी गुंतवणुकीसह महाराष्ट्रात दाखल झालेल्या जनरल मोटर्स, मर्सिडिस, फियाट, वॉक्सव्ॉगन, ऑडी, स्कोडासारख्या नामवंत ऑटोमोबाईल कंपन्या, सिंचनासाठी आठ हजार कोटींवर गेलेली तरतूद, अमराठी शाळांमध्ये मराठी विषयाची सक्ती, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची नियुक्ती असे अनेक निर्णय त्यांच्या कारकीर्दीत घेण्यात आले. पण बहुतांश निर्णयांची परिणामकारकता दिसली नाही. आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्राला वीजेचा प्रश्न सर्वाधिक त्रास सहन करावा लागला याची त्यांना आजही खंत वाटते.
मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसून विलासरावांनी आपल्या तिन्ही पुत्रांचेच भले करण्यात वेळ घालविला, अशी टीका झाली. सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याशी त्यांची कोटय़वधींची व्यावसायिक भागीदारी असल्याचेही आरोप झाले. रियल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रकल्पांची कंत्राटे विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांच्या इशाऱ्यावर काही ठराविक कंपन्यांना दिले जात असल्याचे आरोप झाले. मुख्यमंत्रीपदावरून खेचण्यासाठी नारायण राणे त्यांच्यावर सतत घोटाळे व भ्रष्टाचाराच्या आरोपांचा भडिमार करीत होते. नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे तुफान आरोप केले. विलासरावांनी १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकून गडकरींना न्यायालयात खेचले.
मुंबईसाठी हाती घेतलेल्या प्रकल्पांचे तसेच महत्त्वाच्या निर्णयांचे मुंबई आणि दिल्लीत प्रभावी मार्केटिंग करणे त्यांना जमले नाही. आज मुंबईतील बहुतांश प्रकल्पांचे श्रेय अशोक चव्हाण यांना जात असल्याचे शल्य त्यांना बोचत असेल. सर्वांचे लक्ष कळसाकडे असते, पाया कोणी रचला हे कुणी बघत नाही, असे ते बोलूनही दाखवितात. विलासरावांना दोन्हीवेळा घरबसल्या म्हणजे मुंबईत राहूनच मुख्यमंत्रीपद मिळाले. शिवाय राज्यात किंवा केंद्रात मंत्री होताना त्यांना दिल्लीत फिल्डिंग लावण्याची फारशी गरज पडली नाही. या गोष्टींचाही परिणाम त्यांच्या राजकीय रिफ्लेक्सेस्वर झाला असेल. प्रसिद्धी यंत्रणा अपयशी ठरल्याने दिल्लीतील श्रेष्ठींना खूष आणि समाधानी ठेवणे त्यांना जमलेच नाही. पहिल्या इनिंगपेक्षा दुसरी इनिंग अधिक प्रभावी ठरेल हा विलासरावांचा आडाखा चुकला. मुख्यमंत्रीपदासाठी झालेल्या तडजोडीत राष्ट्रवादीला आणखी तीन कॅबिनेट मंत्रीपदे द्यावी लागल्याने सत्तेतील काँग्रेसची बाजू आणखीच लंगडी झाली होती. त्यातच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षभरातच विलासरावांचे कट्टर प्रतिस्पर्धी नारायण राणे त्यांच्याच पुढाकाराने शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून समावेश केल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी राणेंनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत विलासरावांचा पिच्छाच पुरवला. आधी विरोधी पक्षात आणि नंतर काँग्रेसमध्ये असताना कमालीचे कटु संबंध अनुभवल्यानंतरही आज विलासराव आणि राणे यांचे चांगलेच सख्य आहे. मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत राणेंमुळे झालेल्या मनस्तापाचा ते उल्लेखही करीत नाहीत.
मुख्यमंत्रीपदाचा सुरुवातीचा काळ सोडल्यास विलासरावांना निश्चिंतपणे सत्ताकारण करण्याची संधीच मिळाली नाही. मुख्यमंत्रीपदाच्या आठ वर्षांंच्या कारकीर्दीत त्यांचे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी कधीच जमले नाही. गोविंदराव आदिक, रणजित देशमुख आणि प्रभा राव या तिन्ही प्रदेशाध्यक्षांनी विरोधात सतत मोहीमा राबवून विलासरावांना पुरते बेजार केले. विलासरावांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यात निर्णायक भूमिका बजावणारे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माधवराव शिंदे यांच्या अपघाती निधनानंतर तर दिल्लीतील हायकमांडशीही त्यांचे सतत खटके उडायला लागले. त्यांच्या विरोधात तक्रारी करणाऱ्यांना मुंबईत गोविंदराव आदिक, रणजित देशमुख आणि प्रभा राव तर दिल्लीत वायलर रवी, मार्गारेट अल्वा यांनी खुले व्यासपीठच उपलब्ध करून दिले. त्याचा सर्वाधिक लाभ उठविण्याचा नारायण राणे यांनी प्रयत्न केला. पण विलासरावांच्या विरोधातील राणेंच्या दिल्लीवरील आक्रमणाचा विनासायास फायदा अशोक चव्हाण यांनाच झाला.
पायाभूत सुविधांचे महत्त्व जाणणाऱ्या विलासरावांनी मुख्यमंत्री असताना भलेही शिरवळला जाण्यासाठी कात्रजचा घाट ‘भेदला’ असेल, पण आपल्या राजकीय प्रतिस्पध्र्यांना कात्रजचा घाट दाखविण्याचे पेटंट घेतलेल्या शरद पवारांनी पडद्याआडून केलेल्या खेळींना चोख प्रत्युत्तर देण्याचे सामथ्र्य ते दाखवू शकले नाहीत.बुद्धिबळाच्या खेळात आणि राजकारणातील डावपेचांमध्ये निष्णात असलेले विलासराव मुख्यमंत्री असताना पवारांना शह देतील, ही हायकमांडची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. हायकमांड आणि पक्षांतर्गत विरोधकांशी दिवसरात्र झुंजणाऱ्या विलासरावांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत एक टप्पा असाही आला जिथे त्यांचे बहुतांश विरोधक मानसिकदृष्टय़ा नेस्तनाबूत झाले होते. २००८ ची दिवाळी विलासरावांसाठी सुखाची, समाधानाची आणि भरभराटीची ठरली होती. विलासरावांवर सतत वक्री नजर ठेवणाऱ्या मार्गारेट अल्वा-प्रभा राव युतीचे सावट त्यांच्या राजकारणावरून दूर झाले होते. त्यामुळे त्यांना सतत धारेवर धरणारे नारायण राणे यांचाही धीर खचला होता. प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या खिशातले समजले जाणारे माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती झाली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदमही त्यांना वश झाल्यासारखे वाटत होते. वर्षभरानंतर होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आणि त्यापूर्वी चार महिने आधी होणारी लोकसभा निवडणूक विलासरावांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार हे जवळजवळ निश्चित मानले जात होते. पक्षांतर्गत विरोधकांचा पुरता बंदोबस्त केल्यानंतरपुढचे अकरा महिने भन्नाट वेगाने सुटायचे, असा ते मनाशी हिशेब करीत असतानाच २६/११ चा दहशतवादी हल्ल्याने सारी समीकरणे उधळली गेली. या भीषण हल्ल्यासाठी जबाबदार ठरवून राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि केंद्रातील गृहमंत्री शिवराज पाटील यांना राजीनामे द्यावे लागले. दबावाखाली असूनही हायकमांडने विलासरावांना अभय दिले होते. पण त्याचवेळी विलासरावांचे दुर्दैव आड आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भग्नावस्था झालेल्या हॉटेल ताजचे विलासरावांसोबत ‘टेरर टुरिझम’ करण्याची इच्छा अभिनेतापुत्र रितेश आणि चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांना आवरता आली नाही. कळस म्हणजे विलासरावांच्या माहिती व जनसंपर्क खात्यातर्फे त्याची सीडी सर्व माध्यमांना देण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून विलासरावांची सद्दी तिथेच संपुष्टात आली.
बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य म्हणून विविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना विलासरावांना महाराष्ट्राचे प्रश्न आणि जनतेच्या समस्यांची चांगली जाण झाली. आपल्या खात्यांचा सखोल अभ्यास करून विधिमंडळात अचूक उत्तरे देणारे मंत्री असा लौकिक त्यांनी संपादन केला. उमद्या व्यक्तिमत्वामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांपासून कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये तसेच विविध राजकीय पक्षांमध्ये त्यांचा मित्रसंग्रह वाढला. तोंडावर वाईट बोलणे तसेच सहकाऱ्याचा अपमान होईल, अशा पद्धतीने जाहीरपणे किंवा खासगीत कानपिचक्या देणे त्यांच्या स्वभावात नसल्यामुळे ते राजकीय वर्तुळात लोकप्रिय झाले. मराठवाडय़ाचे असूनही पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना महत्त्व लाभले. पवारांच्या तोडीचे नेते म्हणून मराठा समाजात त्यांचा दबदबा वाढला. १९९९ साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या या सर्व क्षमतांचा व गुणवैशिष्टय़ांचा राज्याला फायदा होईल, अशी आशा वाटणे स्वाभाविक होते. पण विलासरावांना असलेली राज्यांच्या समस्यांची जाण आणि त्यांच्या गाठीशी असलेला राजकीय अनुभव यांचा महाराष्ट्राला दुर्दैवाने हवा तसा फायदा झाला नाही. मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विलासराव जास्तच बेफिकीर व निष्क्रिय ठरल्याचा ठपका त्यांच्यावर वारंवार ठेवला गेला. विलासरावांच्या हसतमुख चेहऱ्याने त्यांचे राजकारणात नुकसानही झाले. गंभीर प्रश्नांना सामोरे जातानाही बेफिकिर असल्याचा भास त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोलीने निर्माण केला. नावच विलास असल्यामुळे ‘विलासी मुख्यमंत्री’ असा विरोधकांचा उपरोधही त्यांना सहन करावा लागला. शिवसेनाप्रमुखांनी तर त्यांचे ‘खुशालचेंडू’ असे वर्णन केले. चित्रपट पुरस्कारांचे कार्यक्रम आणि सांस्कृतिक मैफलींमधील त्यांच्या सातत्यपूर्ण उपस्थितीचेही विरोधकांनी भांडवल केले. सिनेस्टार पुत्र रितेशच्या प्रेमापोटी ते बॉलीवूडच्या नको तितके जवळ गेले आणि त्यातच त्यांना मुख्यमंत्रीपद गमावावे लागले, असेही म्हटले जाते. तणावाच्या प्रसंगांमध्ये त्यांचे तणावमुक्त वागणे व दिसणे अनेकांना खटकले.
विलासरावांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रगती होण्यापेक्षा पीछेहाटच झाली. विलासरावांचे राजकीय गुरु शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना मराठवाडय़ात जायकवाडी प्रकल्प आणला, पण महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील असा कोणताही निर्णय किंवा प्रकल्प विलासरावांच्या कारकीर्दीत झाला नाही, असा आरोप त्यांचे विरोधक करतात. विलासरावांच्या कारकीर्दीत कायमचे लक्षात राहतील मोठे प्रकल्प उभारले गेले नाही, हे खरे असले तरी महाराष्ट्राला पुढे नेणारे अनेक छोटे पण महत्त्वाचे निर्णय झाले. अंमलबजावणीच्या अभावी बरेच निर्णय कागदोपत्रीच राहिले. पण जे निर्णय अंमलात आले, त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग कायम राहिला. विलासराव पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्र कर्जबाजारी होऊन दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर पोहोचला होता. त्यावेळी राज्यात कृष्णा खोऱ्याचे प्रकल्प पैशाअभावी रखडले होते. एन्रॉन प्रकल्पाचे भूत मानगुटीवर बसले होते. महाराष्ट्र आजच्यासारखा आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत नव्हता. त्या स्थितीतून महाराष्ट्राने आज २०१० मध्ये संपन्नतेच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यामुळे विलासरावांच्या कारभाराचे मूल्यमापन त्यांच्या सरकारने घेतलेल्या छोटय़ा-छोटय़ा निर्णयांतूनच करावे लागेल. ‘समयसे पहले और मुकद्दर से जादा कभी कुछ नही मिलता’ या उक्तीवर त्यांचा गाढा विश्वास आहे. राजकारणात यश मिळविण्यासाठी संयम आणि विधिलिखितही महत्त्वाचे ठरते, याचाही त्यांना भरपूर अनुभव आला आहे. स्वतच्या राजकारणाला लागू होणारा हा तर्क कदाचित त्यांनी राज्याचा कारभार चालवितानाही लावला असावा. एक सुसंस्कृत, मनमिळावू, चतुर, बुद्धिमान, मुत्सद्दी राजकीय नेता म्हणून विलासरावांची प्रतिमा महाराष्ट्रासाठी कितपत उपयुक्त ठरली, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण त्याकडे विलासराव वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भानगडी आणि घोटाळे चिकटल्यावाचून राहात नाही. पण आपल्याला कोणतेही वाद चिकटले नाही म्हणून विलासराव आपल्या कारकीर्दीवर पूर्ण समाधानी आहेत. मात्र, मुख्यमंत्री म्हणून त्यांना लाभलेल्या ८८ महिन्यांच्या दीर्घ कारकीर्दीमुळे महाराष्ट्र कितपत समाधानी आहे हा मात्र वादाचाच मुद्दा ठरला आहे.

जन्म : २६ मे १९४५ (बाभळगाव, लातूर)
भूषविलेली अन्य पदे
राज्य मंत्रिमंडळात महसूल, ग्रामविकास, कृषी, उद्योग, शिक्षण, सामान्य प्रशासन,
सहकार, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, सांस्कृतिक कार्य, पर्यटन, गृह (राज्यमंत्री) ही खाती भूषविली.
१९७४ मध्ये बाभळगावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ ’ जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद. ’ सध्या केंद्रात अवजड उद्य्ोगमंत्री
राजकीय वारसदार
पूत्र अमित हे लातूर शहर मतदारसंघाचे आमदार.
बंधू दिलीप देशमुख हे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार.
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
१८ ऑक्टोबर १९९९ ते १७ जानेवारी २००३
१ नोव्हेंबर २००४ ते ३० नोव्हेंबर २००८
पक्ष : काँग्रेस
१९८० मध्ये पहिल्यांदा आमदार.

सुनील चावके,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०

नारायण राणे (महाष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)



राजकारणात एक अधिक एक याचे उत्तर दोन असे कधीच असत नाही. सत्तासंघर्षांची गणिते तर भल्याभल्यांना चक्रावून टाकतात. अनिश्चिततेचा लंबक क्षणाक्षणाला दोन्ही टोके गाठत असतो. या लंबकाच्या कुठल्याशा एका शतांश सेकंदाच्या स्थिरावण्यावर ‘मुख्यमंत्री’ नावाचा एक भाग्ययोग कोरलेला असतो. नारायण तातू राणे या आठ अक्षरी नावापुढे तो स्थिरावला तेव्हा महाराष्ट्रात केवढा गहजब झाला !

अक्षरश: लाखोंच्या भुवया उंचावल्या. अनेकांना सांस्कृतिक धक्काच बसला. महाराष्ट्रभर भाषणांचे रान पेटवून, हिंदुत्वाची मशाल चौफेर फिरवून ‘शिवशाही’ आणणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना अचानक काय झालेय तरी काय, असा प्रश्न अनेकांच्या तोंडावर होता. दैवाने दिलेले कर्माने घालवता की काय, याच जातकुळीचा हा प्रश्न होता आणि तो थेट शिवसेनाप्रमुखांनाच उद्देशून होता. याचे कारण आधीच्या चार वर्षांतला इतिहास उभ्या महाराष्ट्राला ठाऊक होता. घटनांतील एकेक दुवा साऱ्यांना तोंडपाठ असल्याप्रमाणे होता. शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाचे जबरदस्त गारुड, पवारांना पुरते बदनाम करण्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन दुकलीला आलेले यश, याच्या जोडीला बंडखोरांच्या रुपाने काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीची झालेली पुरती वाताहात यामुळे शिवसेना-भाजप युती दाणकन सत्तेवर आली होती. साखर सम्राटांच्या हुकमी पट्टय़ासह काँग्रेसमध्ये एक -दोघांनी नव्हे तर तब्बल ३५ महत्त्वाकांक्षी स्थानिक पुढाऱ्यांनी बंडखोरी केली होती. तीच अखेर काँग्रेसच्या मुळावर आली आणि सत्ता येईल की तोंडचा घास १९९० प्रमाणे जाईल, अशा संभ्रमात असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या डोळ्यांपुढे सत्तेचे स्वप्न त्यांच्या वयाच्या ६८ व्या वर्षी साकारले होते. मला लोकशाही नको, आमची ‘शिवशाही’ असेल, असे प्रत्येक भाषणात सांगत महाराष्ट्राच्या भाबडय़ा जनतेच्या हृदयाला हात घालत बाळासाहेबांनी सत्ता एकहाती खेचून आणली होती !
याच एका हातात मग मनोहर जोशी यांना आपल्या तालावर नाचवू पाहणारा रिमोट कन्ट्रोल आला. अस्वलाच्या नाकात वेसण घालून त्याला बरहुकूम खेळ करायला लावणाऱ्या खेळात जसा मदारी सूत्रधार असतो, तशीच गंमत जात्याच खटय़ाळ व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांना अनुभवायची होती. रिमोट कन्ट्रोल हा तर त्यांचा भारी आवडता आणि जणू काही सत्तेच्या परवलीचा शब्द बनला होता.
मुख्यमंत्री म्हणून राज्यशकट हाकताना मनोहर जोशी शब्दश: तारेवरची कसरत करीत होते आणि जवळपास प्रत्येक पत्रकार परिषदेत बाळासाहेब रिमोट कन्ट्रोलचा उच्चार करीत होते. जणू काही बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या सत्तेचा बुद्धिबळ मांडला होता आणि मनोहर जोशी हे या खेळातील बाळासाहेब आपल्या मर्जीप्रमाणे हलवू शकतील, असे प्यादे होते. ‘रिमोट कन्ट्रोल’चा उच्चार हा मनोहर जोशींनाच प्रत्येक वेळचा इशारा होता आणि जोशींनाही तो पुरता कळत होता.
याच चार वर्षांत शिवशाहीत आणि त्यातही शिवसेनेत एक वेगळा जबरदस्त संघर्षही सुरु झाला होता. जवळजवळ २९ वर्षे सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या शिवसेनेला खऱ्याखुऱ्या अर्थाने सत्ता उपभोगायला मिळत होती आणि त्यात अधिकचे वाटेकरी जराही नको, असा जहरी स्वार्थही फैलावायला सुरुवात झाली होती. मनोहर जोशी हे पक्षासाठी काही ‘जमवत’ नाहीत, अशा कागाळ्या मातोश्रीवर जाऊन थेट बाळासाहेबांकडे करणे सुरु झाले होते. बहुजनसमाजाचा त्यातही ओबीसींचा मोठा पाठिंबा मिळूनही शिवसेनेची प्रतिमा ब्राह्मणांचा पक्ष अशी काहीशी झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. १९९० साली जेव्हा शिवसेनेकडे प्रमुख विरोधी पक्षनेतेपदाची संधी चालून आली होती तेव्हा बाळासाहेबांनी छगन भुजबळ हे इच्छुक असूनही सेनेत ज्येष्ठ असलेल्या मनोहर जोशी यांनाच झुकते माप दिले होते. त्याच वेळी शिवसेनेत भटाब्राह्मणांनाच भविष्य आहे, अशी कुजबुज डावललेल्यांकडून सुरु झाली होती. म्हणूनच सत्तेचा चमत्कार घडताच पुन्हा मनोहर जोशी यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद सोपवताना बाळासाहेब संभ्रमात होते. त्यामुळेच पुढच्या चार वर्षांत जोशींच्या ‘चुका’ बाळासाहेब जणू शंभर अपराधांसारखे मोजत होते. जोशींवर पक्षांतर्गत मात करून आपण मुख्यमंत्री बनू शकतो ही महत्त्वाकांक्षा एकेकाळी बाळासाहेबांबरोबर सावलीसारखे असणाऱ्या राणेंच्या मनात त्याच वेळी भडकू लागली होती. महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेबांना आपण ‘समजावू’ शकतो, हा जबरदस्त आत्मविश्वास त्यांना आला होता. खरे तर नारायण राणे यांची शिवसेनेतील कुंडली, त्यांनी घेतलेली झेप हे कोणत्याही राजकारण्याला विस्मयचकित करणारे होते. पण चेंबुरमध्ये एकेकाळी स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यात वावरणारे राणे हे तोपर्यंत नगरसेवकपद, ‘बेस्ट’चे तीनदा अध्यक्षपद आणि मग नंतर आमदारपद मिळवत बाळासाहेबांच्या गळ्यातील लाडका ताईत बनले होते हेही तितकेच वास्तव होते. अन्यथा उण्यापुऱ्या चौदा वर्षांत राणेंनी नगरसेवकपदावरुन मुख्यमंत्रीपदापर्यंत हनुमान उडी मारणे ही केवळ अशक्य कोटीतील भासणारी अशी बाब होती.
मनोहर जोशींच्या नातेवाईकांचे भूखंड प्रकरण हा ‘मातोश्री’च्या दृष्टीने त्यांचा अखेरचा अपराध ठरला आणि राणे यांनी लावलेली ‘सर्वस्तरीय’ फिल्डिंग कामी आली. असे म्हटले जाते की, ज्याला हवे त्याला ‘खूश’ करण्यात राणे यांचा हात कुणीही धरू शकत नाही. हिकमतबाज राणेंनी मनधरणीपासून सर्वकाही करीत ‘मातोश्री’पासून सर्वांना आपलेसे केले आणि शिवसेनाप्रमुखांचा कौल मिळवला.
त्यानंतरची घटना एखादे नाटक वा चित्रपटात शोभावी अशी होती. या घटनेने शिवशाहीतील इतिहासाचे एक वेगळे पान लिहिले. ३० जानेवारी १९९९ च्या रात्री मातोश्रीवर काही खास घडामोडी घडल्या. एक बेत शिजला. ३१ जानेवारी रोजी बाळासाहेबांनी आशीष कुळकर्णी आणि किरण वाडीवकर या शिवसेनेत तोपर्यंत फारसे नाव नसलेल्या निकटवर्तीयांना बोलावून घेतले आणि त्यांच्या हातात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना देण्यासाठी एक पत्र दिले. ‘राज्यपालांकडे जाऊन त्वरित मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मला फोन करु नये.’ अशा दोन ओळींचे ते पत्र होते. बाळासाहेबांच्या राजकारणातील अत्यंत आवडत्या अशा धक्कातंत्राचा हा एक हुकूमी प्रयोग होता !
या प्रयोगानंतर अवघ्या काही तासांतच म्हणजे १ फेब्रुवारी १९९९ रोजी राणे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अपक्षांच्या कुबडय़ा घेऊन चालणाऱ्या युती सरकारमध्ये आधीच ‘मराठा जातीचा’ मुख्यमंत्री हवा, अशी मागणी सुरु होती. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या राणे यांनीच या मागणीला हवा घालत, अग्नी फुलवला होता. त्यातच युतीतील भागीदार भाजपचे राज्याचे तत्कालीन सूत्रधार असलेले उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री मनोहर जोशींवर विविध कारणांनी नाराज होते. या साऱ्याचा स्फोट होऊन मुख्यमंत्रीपदाचा लंबक अखेर राणेंच्या नावापुढे स्थिरावला होता. राणेंची मुख्यमंत्रीपदासाठीची ‘तपश्चर्या’ फळाला आली होती !
१९९० सालापासून आमदार म्हणून जोमदार काम करीत असलेल्या राणेंनी मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात प्रथम दुग्धविकास आणि त्यानंतर महसूल मंत्री म्हणून धडाकेबाज काम करून दाखवले होते. पक्षकार्यासाठीही राणे सातत्याने ‘योगदान’ देत होते. मात्र राणेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या आड त्यांची जनमानसातील प्रतिमा येत होती. कोणत्याही भाषेवर प्रभुत्व नसणे हा राणेंचा मायनस पॉईंट ठरत होता. त्यांच्या ‘आक्रमकपणा’चा इतिहास तर त्यांना भोवतच होता. १९९१ साली राजापूरमधून शिवसेनेने वामनराव महाडिक यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे कर्नल सुधीर सावंत यांनी महाडिक यांचा पराभव केला. सिंधुदुर्गात काँग्रेसचे वर्चस्व वाढणे राणेंना परवडणारे नव्हते. कणकवलीत राणेंचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांत खुन्नसचे टोकाचे वातावरण तापले होते. याच धुमसत्या वातावरणात काँग्रेसचे तरुण आणि सक्रिय कार्यकर्ते श्रीधर नाईक यांची दिवसाढवळ्या हत्या झाली आणि तिचा डाग थेट राणेंवर आला. हा आरोप पुढे न्यायालयात टिकला नाही, न्यायालयाने राणे यांची निर्दोष मुक्तता केली. तरी जनमानसातील संशयाचे धुके मात्र राणेंना सातत्याने चकवा देत राहिले. अशी सारी पाश्र्वभूमी असताना बाळासाहेबांनी राणेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देण्याचे एक धाडस केले होते आणि धाकदपटशाच्या तंत्रात वाकबगार असलेल्या राणेंसारख्या माणसाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्रीपदी बसवले, असा या सर्वसामान्य जनमानसाचा राणेविरोधी सूर होता.
मात्र हाच सूर आठ महिन्यांच्या अत्यंत छोटय़ा कालावधीत राणेंनी बदलून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांकडून कायम दुर्लक्षित ठेवल्या गेलेल्या कोकणामधील पहिला मुख्यमंत्री बनण्याचा पहिला मान बॅ. अंतुले यांना लाभला होता. मनोहर जोशी हे कोकणातील दुसरे मुख्यमंत्री ठरले तर राणे तिसरे. बॅ. अंतुले यांची ख्याती झटपट निर्णयांची होती. मनोहर जोशींनी प्रत्येक बाब तपासून पाहात आणि मातोश्रीकडे पाहात निर्णय घेण्याची शिस्त स्वत:ला लावून घेतली होती. राणेंनी अंतुलेंच्या तुलनेत दुप्पट वेगाने निर्णय घेण्यास सुरुवात केली. ‘दाता’ अशी राणेंची जी प्रतिमा आहे ती याच काळात गडद झाली. दुग्धविकास खात्याचे मंत्री म्हणून ‘आरे’मध्ये अनेकांना विशेषत: कोकणातील अनेकांना राणेंनी नोकरीला लावले. थोडक्यात शेकडो कुटुंबांच्या पोटापाण्याची सोय केली. कोकणातीलच नव्हे तर कोणतीही अडलेली व्यक्ती म्हणजे राणेंचा विक पॉईन्ट. त्याच्या हातावर काहीतरी मदत पडणारच, असा लौकिक राणेंनी कमावला. कोकणातील अत्यंत सामान्य कुटुंबातील राणे हे चेंबुरमध्ये एका कनिष्ठ मध्यमवर्गीय वस्तीत वाढले. या तळागाळातील समाजाचे दु:ख, व्यथा याची पुरती जाण असलेल्या राणेंनी हजारोंना व्यक्तिश: मदत तर केलीच पण राज्यातील याच सामान्य वर्गासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा धडाका लावला.
दुग्धविकास आणि मग महसूल मंत्री म्हणून काम करताना सनदी अधिकारी मंत्र्याला कसे फिरवतात, मंत्रालयात अव्वल कारकुनापासून ते कनिष्ठ लिपिकापर्यंतचे सरकारी बाबू फाईलींचा प्रवास कसा रोखून धरतात, हे सारे राणेंनी पाहिले होते, जोखले होते. त्यामुळे राणेंचा मुख्यमंत्री म्हणून पहिला प्रहार बाबुशाहीवर झाला. मंत्रालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना सकाळी साडेदहानंतर मंत्रालयाचे दरवाजे बंद राहतील, असे फर्मान मुख्यमंत्री राणे यांनी काढले. वेळेचा कोणताही मुलाहिजा न बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वक्तशीरपणाची शिस्त लावण्याचा राणे यांचा हा प्रयत्न होता.
राणेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीतील त्यांनी घेतलेला सर्वाधिक धक्कादायक निर्णय हा झुणका - भाकर योजना बंद करण्याचा होता. खरे तर ही योजना म्हणजे युतीचे, अर्थातच बाळासाहेबांचे लाडके अपत्य होते. ‘सामान्यातील सामान्याला, गरिबाला फक्त एक रुपयांत झुणका -भाकर’, या घोषणेमुळे राज्यभरात मतदारांनी युतीला भरभरून मते दिली होती.
या योजनेचा दुहेरी फायदा होता. गरिबांना स्वस्त खाणे मिळण्याबरोबरच युतीच्या कार्यकर्त्यांना झुणका - भाकर केंद्रांसाठी मोक्याच्या जागा, अर्थात रोजगाराचे हक्काचे नवे साधन मिळाले होते. मात्र काही वर्षांतच योजनेचा बट्टय़ाबोळ करायला अनेकांनी प्रारंभ केला. मुंबईसारख्या शहरात ज्यांना केंद्रे मिळाली होती त्या युतीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र चालविण्याचा प्रचंड आळस आणि सहज मिळणाऱ्या पैशांच्या मोहापोटी केंद्रे भलत्यांनाच विशेषत: परप्रांतीयांना चालवायला दिली आणि योजनेच्या मुळ उद्दिष्टालाच हरताळ फासला. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अकारण आर्थिक बोजा पडत होता आणि ‘चोरांचे’ फावत होते. राणेंनी हे सारे समजून घेतले आणि कुणाला काय वाटेल याची पर्वा न करता एका कठोर राज्यकर्त्यांची भूमिका बजावली. या योजनेला राणेंनी सरळ टाळेच लावले. झुणका - भाकर योजनेतील भाकर अशी केंद्र बहाल झालेल्यांच्या हव्यासापोटी करपून गेली. महाराष्ट्रातील एका चांगल्या योजनेची माती झाली.
शासकीय पातळीवर कारभार गतिमान करण्यासाठी राणे यांनी जो दुसरा निर्णय घेतला तो वादग्रस्त ठरला असला तरी त्याचा उद्देश चांगला होता. सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून कमी करून ते ५८ वर आणण्याचा हा निर्णय होता. या निर्णयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या नव्या भरतीची आणि गतिमान कारभाराची बीजे होती. राणे यांच्या निर्णयामुळे सरकारी
कर्मचाऱ्यांचा एक वर्ग जो निवृत्तीच्या आसपास आला होता तो नाराज होणे स्वाभाविक होते. पण एकदा मनात आणले की करून दाखवायचे हा राणे यांचा खाक्या आहे. त्यानुसार हा निर्णय त्यांनी अमलातही आणला.
कुटुंबप्रमुखाचे आकस्मिक निधन झाल्यास त्याच्या परिवाराला २५ हजार रुपयांची मदत करण्यासाठी जिजामाता महिला आधार विमा योजना, बेघरांना घरबांधणीसाठी दहा हजार रुपये, शेतकऱ्यांसाठी बळीराजा संरक्षण विमा योजना असे काही लोकप्रियतेच्या लाटेवर नेणारे निर्णय मुख्यमंत्री म्हणून राणे यांनी घेतले. युतीच्या आधीच्या चार वर्षांत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा,’ ही कल्पना तडफदार सार्वजनिक बांधकाम मंत्री नीतिन गडकरी यांनी राबवली होती. त्यानुसार मुंबईत ५५ उड्डाणपुलांची योजना साकारून युतीचा कारभार लोकाभिमुख केला होता. याच वाटेवरून राणे यांनी रस्तेबांधणी, वीज निर्मिती, पाटबंधारे या क्षेत्रांत खाजगी क्षेत्रांचा सहभाग घेण्याचा पुकारा ठामपणे केला. मात्र राणे यांची आठ महिन्यांची कारकीर्दही सहजसोपी नव्हती. महसूलमंत्री म्हणून त्यांनी काही भूखंडाबाबत घेतलेल्या निर्णयावरून ते टीकेचे लक्ष्य होऊ लागले होते. चर्चा होऊ लागली होती. काही जण न्यायालयात जाण्याच्या तयारीत होते. पण राणेंनी त्याची पर्वा केली नाही. प्रशासनावर उत्तम पकड असलेला एक कडक मुख्यमंत्री, अशी प्रतिमा निर्माण करण्यात राणे यशस्वी झाले. उच्च शिक्षण झालेले नसले तरी व्यवहारज्ञानाच्या ताकदीवर, अंतर्मनाची साद ऐकत राज्यशकट हाकता येतो, राजकारण करता येते याचे उदाहरण वसंतदादा पाटलांच्या रुपाने राणे यांच्या समोर होते. त्यामुळेच प्रश्न, विषय समजून घेत राणे यांनी निर्णयांचे दरबार भरवले. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जे रस्त्यांचे जाळे दिसते त्यात मोठा वाटा राणेंच्या पाठपुराव्याचा आहे.
एखाद्या धूमकेतूच्या आगमनाप्रमाणे साऱ्यांना अचंबित करीत राणेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवले गेले. मात्र मंत्रीपदापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या कालावधीत राणेंनी आपल्या इस्टेटी केल्या, पेट्रोलपंप पदरात पाडून घेतले, स्वत:चे ‘राणे साम्राज्य’ उभे केले, सिंधुदुर्गात विशेषत: कणकवली, मालवणात गुंडगिरीचा माहौल उभा केला, अशी टीका विरोधकांकडून झाली. ज्या वेगाने राणे महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानावर बसले त्याच वेगाने किंबहुना त्याहून अधिक गतीने त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे साम्राज्य खालसा होईल, अशी कणभर कल्पनाही कुणी केली नव्हती. पण राजकारणात अनेकदा असे अतक्र्य, अगम्य, अघटित घडत असते. १९९९ च्या सप्टेंबरमध्ये वाजपेयी सरकार एका मताने पडले आणि लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. कारगील युद्धाच्या पाश्र्वभूमीवर लोकसभेबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्यास त्या जिंकू असे प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांना पटवून दिले आणि राणेंचा मुख्यमंत्रीपदाचा डाव अध्र्यावरच मोडला. १७ ऑक्टोबरला राणे राज्यपालांकडे गेले आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आले तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीला अवघे आठ महिने आणि सोळा दिवस पूर्ण झाले होते!
जेमतेम साडेआठ महिन्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कालावधी. त्यातही दोन महिने आचारसंहितेचे. म्हणजे प्रत्यक्ष कारभार साडेसहा महिन्यांनाच. इतक्या कमी कालावधीत राज्यासाठीचे धोरणात्मक निर्णय घेणे हे कठीणच काम. पण राणेंनी त्यातही धडाका लावण्याचा प्रयत्न केला. त्याची फळे मिळणे अर्थात विधानसभा निवडणुकांत अपेक्षित होते. मात्र युतीच्या एकुण कारभाराला जनता कंटाळली होती. काँग्रेसमध्ये याच दरम्यान फूट पडली. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वत:ची नवी चूल मांडली. या चुलीवर दहा - वीस नव्हे तर तब्बल ५६ ‘खाद्यपदार्थ’ करण्यात पवारांना यश आले. काँग्रेसच्या आमदारांचा आकडा ७५ वर स्थिरावला. संभ्रमित जनतेने राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण केली. मात्र तरीही दोन्ही काँग्रेस सत्तेसाठी एकत्र आल्या. या पाश्र्वभूमीवर आजही राजकीय तज्ज्ञांत चर्चा रंगते ती ‘राणे यांना जर आणखी सहा महिन्यांचा कालावधी मिळाला असता तर,’ या विषयाची. मात्र या चर्चेमागे युती आणि शिवसेनेतील त्या काळातील छुप्या संघर्षांच्या अनेक कहाण्या दडलेल्या आहेत. एक तर विधानसभा निवडणुकांना असे मध्येच सामोरे जाऊ नये, असेच राणे यांचे मत होते. तसे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले होते. त्यामागे मुख्यमंत्रीपद फारच लवकर सोडावे लागते आहे, ते जाऊ नये असा त्यांचा स्वार्थ होताच पण निवडणुकीच्या लढाईसाठी काही वेळ मिळावा, अशीही अपेक्षा होती. मात्र तोपर्यंत राणे यांची महत्त्वाकांक्षा कमालीची वाढली आहे, याची खबर ‘मातोश्री’ला कधीच लागली होती. राणे खाजगीत बोलताना ‘आपण भविष्यात ‘युवराजां’चे नेतृत्व कदापि मान्य करणार नाही, असे बोलत असल्याचे मातोश्रीच्या कानावर वारंवार येऊ लागले होते. या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय युतीने घेतला. तो साफ फसला. राणेंचा डावही अध्र्यावरच मोडला!’ ‘तुला ना मला, घातले दोन्ही काँग्रेसला’ अशी दशा आपण स्वत:हून करून घेतली आहे, हे युतीच्या नेत्यांच्या लक्षात आले.. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता !
अक्षरश: औटघटकेचेच मुख्यमंत्री ठरलेल्या नारायण राणे यांना सत्तेचा हा प्याला अर्धामुर्धाच राहिला असे अद्यापही वाटते. त्यामुळेच तर नंतरच्या काळात त्यांची मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीची ओढ अधिकच तीव्र झाली. या घटनेला आता तब्बल अकरा वर्षे उलटली. मधल्या काळात राणेंनी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे सर्रकन टोपी फिरवली. बाळासाहेबांची आठवण येताच अद्यापही डोळ्यांत टचकन पाणी येणाऱ्या राणेंची भगवी टोपी बघता बघता काँग्रेसवाल्यांची गांधी टोपी झाली. एखाद्या सराईत जादुगारालाही जमले नसते इतक्या चपळाईने राणेंनी आपल्या निष्ठेच्या पोतडीतून शिवसेना नावाचे त्यांच्यासाठी जुने झालेले खेळाचे सामान भंगारात फेकून दिले आणि काँग्रेसच्या अंगारांचा नवा खेळ करायला ते सिद्ध झाले. असे असले तरी सत्तेचा भरलेला प्याला आकंठ पिण्याची, अनुभवण्याची त्यांची असोशी अपूर्णच राहिली आहे. नियतीने राणेंचा मुख्यमंत्रीपदाचा प्याला अद्यापही अर्धाच ठेवला आहे. तो का, याचे उत्तर कदाचित नियतीलाच ठाऊक आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून सातत्याने होणारा उल्लेख राणेना छळतो आहे. अगदी अलिकडेच राणे लवकरच मुख्यमंत्री होणार असा होरा वर्तवण्यात आला आहे. तसे झाले तर राणेंनी आपल्या राजकीय कारर्कीदीतला दुसरा चमत्कार घडविल्यासारखे होणार आहे!

जन्म : १० एप्रिल १९५२ (मालवण)
भूषविलेली अन्य पदे
१९८५ मध्ये मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवड ’ राज्य मंत्रिमंडळात महसूल, उद्योग, दुग्धविकास, पशूसंवर्धन, पुनर्वसन ही खाती. १९९९ ते २००५ या काळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते. ’ ऑगस्ट २००५ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश.
मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात महसूल व उद्योग खाते.
राजकीय वारसदार
पुत्र निलेश हे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार ’ दुसरे पुत्र नितेश हे स्वाभिमान संघटेनेचे प्रमुख.
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
पक्ष : शिवसेना
सध्या महसूलमंत्री (काँग्रेस)
१९९० मध्ये मालवण मतदारसंघातून आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेवर निवड.

रवींद्र पांचाळ,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०

मनोहर जोशी (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)



पंधरा वर्षांपूर्वी, म्हणजे महाराष्ट्र पस्तीशीत असताना राज्याच्या राजकारणाने एक महत्वाचे वळण घेतले. राज्याच्या सत्तेवरून काँग्रेसची पकड सुटली व प्रथमच बिगरकाँग्रेस पक्षाचे, म्हणजे शि़वसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. हा बदल अनेकांसाठी धक्कादायक होता. प्रमोद महाजन यांची राजकीय व्यूहरचना, गोपीनाथ मुंडे यांनी राज्य सरकारच्या विरोधात उठविलेले रान, शि़वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा आणि शरद पवार यांचे काँग्रेस पक्षामध्ये चाललेले राजकारण याचा एकत्रित परिणाम मंत्रालयात युतीचे राज्य येण्यात आला.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा शपथविधी शिवाजी पार्कवर झाला होता, राज्याच्या पहिल्या काँग्रेसेतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधीही शिवतीर्थावर होणे साहजिक होते. त्यानुसार मनोहर जोशी यांनी १४ मार्च १९९५ रोजी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
पुढील साडेचार वर्षे मनोहरपंत मुख्यमंत्रीपदावर राहिले. मनोहर जोशी हे नाव तोपर्यंत महाराष्ट्राला परिचित असले तरी मुरब्बी राजकारणी व कुशल प्रशासक असा त्यांचा लौकिक नव्हता. मुंबईचे महापौरपद वगळता कोणतेच महत्वाचे सत्तास्थान त्यांनी भूषविले नव्हते. ते शिवसेनेत होते, पण ते शिवसैनिक आहेत का याबद्दल शंकाच होती. ठाकरे यांना अपेक्षित असलेला सैनिकीबाणा मनोहरपंतांनी कधी दाखविला नव्हता. शिवसेना प्रसिद्ध झाली ती पक्षाच्या आक्रमक व काहीशा रासवट चळवळींमुळे. अशा चळवळीत पंतांचा सहभाग कधीच ठळकपणे दिसला नाही. शिवसेनेत असूनही ते जसे शिवसैनिक नव्हते, तसे राजकारणात असूनही जनतेचे नेते नव्हते. त्यांचा स्वतचा म्हणता येईल असा मतदारसंघ नव्हता. रायगड जिल्हा वा मुंबई शहर यांचे ते प्रतिनिधित्व करतात असेही म्हणता येत नव्हते. त्यावेळपर्यंत शिवसेनेचा प्रवास तसा एकाकीच सुरू होता. मुंबई व ठाणे महापालिका वगळता अन्य ठिकाणी शिवसेना फारशी सत्तेत नव्हती. यामुळे सत्तासंघर्षांचे राजकारण मुळात पक्षालाच अवगत नव्हते, तर मनोहर जोशींसारखे नेते त्यामध्ये पारंगत असणे शक्यच नव्हते. शिवसेनेचे अस्मितेचे राजकारण हे अनेकांना तोडणारे होते व मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ््या कॉस्मॉपॉलीटन शहरावर आणि देशात अग्रक्रमावर असलेल्या महाराष्ट्रावर हा पक्ष कसा राज्य करणार अशी शंका मान्यवरांकडून व्यक्त होत होती.
अडचणी इतक्यापुरत्याच मर्यादित नव्हत्या. मनोहर जोशी हे नाव युतीतही फारसे मान्य नव्हते. प्रमोद महाजन वगळता पंतांना युतीमध्ये खास म्हणता येईल असे मित्र नव्हते. त्यांच्या कार्यक्षमतेवर व धोरणीपणावर बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास असला तरी बाळासाहेबांचे खास वैशिष्टय़ असणारे ठाकरी प्रेम कधीही त्यांच्या वाटय़ाला आलेले नव्हते. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात राजकीय वावटळ उठविली त्यामध्ये मनोहर जोशी कुठेही नव्हते. या आंदोलनाने मुंडेंना अमाप प्रसिद्धी मिळाली व त्यांची राजकीय महत्वाकांक्षा वाढली. त्यांच्या दुर्दैवाने भाजपला शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळाल्या व मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे गेले. याचा एक परिणाम असा झाला की मुंडे कायम अस्वस्थ राहिले. कुरबूर करीत राहिले. जनमानसात वजन असलेला नेता दरबारी नेत्याला जुमानत नाही. शरद पवार यांचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी म्हणूनच कधी जमले नाही. मुंडे यांनीही मनोहर जोशी यांना नेते मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा व प्रमोद महाजन यांचा अंकुश यामुळे मुंडेंना काही उलथापालथ करता आली नाही. पण त्यांच्या मनातील खळबळ कधी लपून राहिली नाही. मनोहर जोशींच्या काळात मंत्रालयातील मुंडेचे रुसवे-फुगवे हा बातम्यांचा चांगला विषय होता.
पंतांना अशा प्रकारे मित्रपक्षाची मनापासून साथ नव्हती. स्वपक्षातील नारायण राणे हे तोपर्यंत थेट स्पर्धेत आले नसले तरी त्यांनी फौजफाटा जमविण्यास सुरुवात केली होती. पुढील काळात राणे यांचा तक्रारीचा सूर वाढत गेला व त्यांनी पंतांना पाच वर्षे पुरी करू दिली नाहीत. महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था तेव्हा बलवान समजली जात असे. ती पूर्णपणे काँग्रेसला अनुकूल होती. कित्येक वर्षांच्या कारभारामुळे काँग्रेस पक्ष व प्रशासन यांची घट्ट वीण बांधली गेली होती. मनोहर जोशी प्रशासनाच्या या पाण्यात कधी उतरलेच नव्हते. प्रशासनाचा अनुभव नाही, मित्रपक्षाची मनापासून साथ नाही, बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण विश्वास नाही, स्वपक्षात कुणी मित्र नाहीत व सत्तासंघर्षांचे राजकारण कधीही केलेले नाही अशा परिस्थितीत मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
तरीही ते साडेचार वर्षे कौशल्याने गाडा हाकीत राहिले. बाळासाहेब ठाकरेंनी घाई केली नसती तर त्यांनी पाच वर्षेही पूर्ण केली असती. १९९९ निवडणुकीनंतरच्या सत्तास्पर्धेत राणे-मुंडे यांच्यापेक्षा कदाचित ते अधिक यशस्वी ठरले असते. अर्थात या जर-तरच्या गोष्टी झाल्या. साडेचार वर्षे युतीचे सरकार चालविणे पंतांना साधले हे नाकारता येत नाही.
हे साधले तीन गोष्टींमुळे. प्रमोद महाजन यांच्याशी जवळीक व त्यांच्या राजकीय कौशल्याचा लाभ ही एक बाब. काँग्रेसमधील पक्षांतर्गत राजकारण करताना शरद पवार यांच्याकडून झालेली अप्रत्यक्ष मदत ही दुसरी बाब. पण त्याहून महत्वाची बाब म्हणजे मनोहर जोशी यांचा धोरणी स्वभाव, मुरब्बी व्यवहार आणि स्वत आखलेल्या मार्गावरून रागद्वेषाची पर्वा न करता चिकाटीने वाटचाल करण्याची वृत्ती. आयुष्याला आपल्याला हवा तसा आकार देण्यात बहुतेकजण अपयशी ठरतात. काही गोष्टी साध्य झाल्या तरी असाध्य गोष्टींची यादी फार मोठी असते. राजकारणात तर असे अस्वस्थ आत्मे जागोजागी भेटतात. मनोहरपंत मात्र समोर आलेल्या प्रत्येक संधींचे सोने करीत आपल्याला हवे ते साध्य करीत गेले.
रायगडमधील नांदवी गावातील गरीब कुटुंबात जोशींचा जन्म. घरात भिक्षुकीची परंपरा. मनोहर जोशीही भिक्षुकी शिकले. पण भिक्षुक राहायचे नाही हे त्यांनी लहान वयातच ठरविले. भिक्षुकी नको म्हणून नोकरी केली. भिक्षुकी करायची नाही हे जसे जोशींनी ठरविले त्याचप्रमाणे गरीब राहायचे नाही असेही ठरविले. असे ठरविणे सोपे असते, पण ठरविलेल्या निर्णयानुसार धोरणीपणाने काम करणे फार अवघड असते. मनोहर जोशींना ते अवघड कामही साधले. ब्राह्मण घरात जन्म व भिक्षुकीचे वातावरण असूनही उद्योगातून पैसा मिळविण्यावर मनोहर जोशींनी लक्ष केंद्रीत केले. पैसा मिळविण्यावर माझा विश्वास होता व आहे असे त्यांनी एकदा म्हटले होते. नोकरी करून भरपूर पैसा मिळविणे शक्य नव्हते. साहजिकच व्यवसाय करण्याचा मार्ग निवडण्यात आला. तांत्रिक शिक्षणाला मागणी आहे हे ओळखण्याची हुशारी त्यांच्याकडे होती. यातही अभियांत्रिकी महाविद्यालये न काढता लहानसहान तंत्रशिक्षणाचे महत्व त्यांनी ओळखले. कोहिनूर संस्था त्यातून उभी राहिली. यातून मनोहर जोशींचा आर्थिक पाया पक्का होत गेला. मोक्याच्या जागा संस्थेसाठी विकत घेऊन त्यांनी हा पाया अधिक पक्का केला. पुढे बांधकाम व्यवसायातही बस्तान बसविले.
अमेरिकेत जसा उद्योजक व राजकारणी असा जोडीने प्रवास चालतो तसा तो मनोहर जोशी यांचा आहे. हेही त्यांचे वेगळेपण म्हणावे लागेल. एका बाजूला उद्योग स्थिरपणे चालू ठेवीत राजकारणातही मोठी पदे सांभाळणारे फारच थोडे नेते आपल्या देशात आहेत. मनोहर जोशी हे जनसामान्यांचे नेते कधीच नव्हते. सर्वसामान्य गरीब जनतेशी त्यांचे कितपत जमले असते याची शंकाच आहे. मात्र विविध क्षेत्रांत संबंध प्रस्थापित करण्याची कला व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक असते. मनोहर जोशींकडे ती होती आणि तीच कला त्यांनी राजकारणातही वापरली.
राजकारणाची त्यांना आवड होती. राजकारणात जावे असे मनापासून वाटतही होते. पण संधी मिळणे कठीण होते. एकतर ते ब्राह्मण होते. राजकारणात केवळ अल्पसंख्यच नाही तर अत्यल्पसंख्य असूनही त्याचे काहीही फायदे मिळू न शकणारी ही जात. किंबहुना देशाच्या दुरवस्थेला एकमेव जबाबदार धरली जाणारी जात. मनोहर जोशींचा धोरणीपणा, हुशारी इथे उपयोगी पडणार नव्हती. चळवळ करून स्वतचे नेतृत़्व उभे करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. पंतांचे वैशिष्टय़ म्हणजे स्वतच्या मर्यादा त्यांना पक्केपणे माहित होत्या. शिवसेनेत ते अचानक आले असे म्हणतात, पण तेथेही काही धोरण ठेऊन ते शिरले असावेत. शिवसेनेत जातीपातींचे राजकारण नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांचे हे फार मोठे वैशिष्टय़ आहे. मात्र त्याकडे सर्वजण काणाडोळा करतात. जात पाहून बाळासाहेब कधीही निर्णय घेत नाहीत असे सांगणारे बरेचजण आहेत. जातींचे राजकारण करण्यास बाऴासाहेबांकडून नकार मिळाल्यामुळेच भुजबळांना सेना सोडावी लागली. शिवसेनेत आपली जात आड येणार नाही हे ओळखून मनोहर जोशी पक्षात शिरले असावेत. बाळासाहेब ठाकरेंशी त्यांची व्यक्तिगत म्हणावी अशी भेट शनिवार वाडय़ावरील सभेनंतर झाली. तेथून बाळासाहेब पेणला आले. मनोहर जोशी बरोबर होते. जोशी बोलता का, अशी विचारणा बाळासाहेबांनी अचानक पेणच्या सभेत केली. जोशींकडे निरीक्षणशक्ती होती व शिक्षक असल्यामुळे बोलण्याचा सराव होता. जोशींनी भाषण चांगले ठोकले आणि ते शिवसेनेचे नेते झाले. कोणतेही आंदोलन, चळवळ न करता. पोलीसांचा मार वा तुरुंगवास न भोगता. एकदा नेतेपद मिळाल्यानंतर त्यांनी झटपट बस्तान बसविले. नेतेपदाच्या वर्तुळातून ते त्यानंतर कधीच बाहेर फेकले गेले नाहीत.
व्यवसाय व शिवसेना असा समांतर प्रवास पुढे बराच काळ चालत राहिला. मनोहर जोशी यांचा शिवसैनिकांशी थेट संपर्क कमीच होता. मात्र बाळासाहेब ठाकरेंशी उत्तम संपर्क होता. बाळासाहेब हे स्वयंस्फूर्त व्यक्तिमत्व आहे. तो कोणत्याही साच्यात बसविता येत नाही. कार्यकर्त्यांना थेट भिडण्याची, त्याला आपलेसे करण्याची किमया त्यांना साधलेली आहे. आयुष्यासाठी पैसा जसा मनोहरपंतांनी महत्वाचा मानला तसे राजकारणासाठी बाळासाहेब हे शक्तिपीठ मान्य केले. या शक्तीपीठाचा त्यांना व्यवसायवाढीसाठी थोडाफार फायदा नक्कीच झाला असेल, पण त्यांनी या शक्तिपीठाला कधीही दगा दिला नाही हेही खरे. आपण स्वयंभू नाही याची पक्की जाण त्यांना होती. त्याचबरोबर अन्य पक्षांमधील शक्तिपीठे आपलीशी करून फार काही साधणार नाही हेही त्यांनी ताडले होते. शिवसेनेतून फुटलेले अन्य नेते व मनोहर जोशी यांच्यात हा फरक आहे.
एकदा राजकारणात उतरल्यावर, आजच्या भाषेत बोलायचे तर त्यांचे फंडे क्लिअर होते. राजकारणातील स्पर्धा मान्य केली की त्या स्पर्धेत हिरिरीने उतरले पाहिजे हे त्यांनी मान्य करून टाकले. पदांना त्यांनी कमी लेखले नाही, तर प्रत्येक पदाचा अधिक वर चढण्यासाठी उपयोग करून घेतला. विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्यांनी स्पर्धा केली. पुढे लोकसभेच्या सभापतीपदासाठी भाजपच्या काही बडय़ा मंत्र्यांबरोबर स्पर्धा केली.
मुख्यमंत्रीपद तर त्यांनी ठरवून मिळविले. युतीला सत्तेवर आणण्यात मनोहर जोशी यांचा वाटा फारसा नव्हता. किंबहुना मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात रान उठविले असताना मनोहर जोशी यांची पवारांशी दोस्ती वाढत चाललेली दिसत होती. दिल्लीत झालेल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनातील लहानसहान कार्यक्रमातही मनोहर जोशींनी शरद पवारांवर अशी काही स्तुतीसुमने उधळीत होते की हे काँग्रेसच्या उंबरठय़ावर उभे आहेत काय, अशी शंका तेथे उपस्थित बऱ््याच बडय़ा मंडळींना येत होती. पण युतीची सत्ता येणार आणि संख्याबळावर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद येणार हे लक्षात येताच मनोहर जोशी ताकदीने स्पर्धेत उतरले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात सुधीर जोशी हे नाव होते हे लपून राहिलेले नाही. मनात एक होते, पण ओठावर दुसरे नाव आणावे लागले अशी कबुली खुद्द बाळासाहेबांनी दिली होती. या काळात मनोहर जोशी यांनी नेमके काय केले हे माहित नाही. पण प्रभावशाली व्यक्तींमधील त्यांची उठबस, संपर्क याचा फायदा निश्चित झाला. शिवसेनेचे सरकार स्थिर राहायला हवे असेल तर मनोहर जोशींशिवाय पर्याय नाही असेही चित्र उभे केले गेले असे म्हणतात. हे खरे असेल तर शिवसेनेतही मनोहर जोशींचा गट होता असे म्हणावे लागते. मुख्यमंत्रीपद त्यांनी हस्तगत केले एवढे मात्र खरे.
मुख्यमंत्री पद मिळविल्यानंतर मात्र त्यांनी बऱ््यापैकी जबाबदारीने कारभार केला. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरही झाले व जावयाच्या जमीनीवरून कोर्टाचा ठपकाही आला. पण अन्य नेत्यांच्या तुलनेत मनोहर जोशींचा कारभार व्यक्तिगत पातळीवर तरी बऱ््यापैकी स्वच्छ राहिला. प्रशासनाचा त्यांना अनुभव नव्हता, पण शरद पवार यांचा कारभार त्यांनी नीटपणे पाहिला असावा असे वाटते. फाईलीचे मर्म त्यांना झटकन लक्षात येत असे. प्रशासनावर पकड बसविण्याची ही गुरुकिल्ली आहे. विषयाचे मर्म कळले नाही तर फायलींच्या आडरानात मंत्र्याने नेऊन प्रशासन कधी गुंगारा देईल हे सांगता येत नाही. जोशींकडे निरीक्षणशक्ती होती. ग्रहणशक्ती चांगली होती व मुख्य म्हणजे अहंकार न ठेवता शिकण्याची वृत्ती होती. मंत्रालयातील शिवसेनेचे आगमन हा अनेकांना कल्चरल शॉक होता. पहिल्या काही वर्षांत तर प्रशासन व नेते यांच्यात जवळपास रोज खटके उडत होते. एकदा शिवसेनेच्या जबाबदार नेत्याकडून ज्येष्ठ सनदी अधिकाऱ््याचा अपमान झाला. हा अधिकारी सचोटीचा होता. कार्यक्षम होता. पुढे दिल्लीत तो मोठय़ा पदांवर गेला. मंत्रालयात त्याचे वजन होते. अशा अधिकाऱ््याचा अपमान झाल्यावर सर्व आयएएस अधिकारी बिथरले. तातडीची बैठक झाली व काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी झाली असती तर सनदी अधिकाऱ््यांचा तो पहिला संप ठरला असता व युती सरकारची अवस्था बिकट झाली असती. सरकारच्या पहिल्याच वर्षांतील ही घटना आहे. नेता जुमानत नव्हता व अधिकारीही ऐकत नव्हते. काम थांबविण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालण्याचे ठरले. त्यानंतर मनोहर जोशी यांनी अतिशय कौशल्याने परिस्थिती हाताळली. शिवसेनेचा नेता व सनदी अधिकारी या दोघांचेही समाधान होईल अशा पद्धतीने त्यांनी मार्ग काढला. प्रशासनाची निष्ठा पक्षाशी नसते, तर नोकरीशी असते असे जोशींचे मत होते. त्यांचे नीट ऐकून घेतले तर ते मदत करतात असा त्यांचा अनुभव होता.
व्यवसायाच्या भाषेत बोलायचे तर विन विन पद्धतीने मार्ग काढण्याकडे मनोहर जोशींचा कल असे. यात ते नेहमी यशस्वी होत असे नव्हे. मुंडे यांचे रुसवेफुगवे हा नेहमीचा व्याप होता. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांची मर्जी सांभा़ळावी लागत असे. एन्रॉनचा विषय त्यांनी असाच शिताफीने हाताळला. व्यवहार साधत असताना त्यांना पदाचा मान फार खाली येऊ दिला नाही. एन्रॉनच्या रिबेका मार्क यांनी प्रथम बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्या उशीरा आल्या. वक्तशीरपणाबद्दल मनोहर जोशी यांची ख्याती होती. वेळ पाळली नाही तर अगदी जवळच्या लोकांनाही ते भेटत नसत. रिबेका मार्क यांनी मुख्यमंत्री पदाचे अवमूल्यन केले आहे असे मनोहर जोशींना वाटले आणि त्यांनी भेट घेण्याचे नाकारले. अप्रत्यक्षपणे हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान होता व बाळासाहेबांचा स्वभाव आणि ताकद लक्षात घेता मुख्यमंत्रीपदावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ त्याचक्षणी आली असती. मनोहर जोशी यांनी ते साहस केले.
अशा आणखीही काही घटना आहेत. पण तरीही तत्वनिष्ठ, कर्तव्यकठोर राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली नाही. अर्थात अशी प्रतिमा होणे ही आपली अपेक्षा असते. मनोहर जोशी यांच्या मनात कदाचित तसे काहीच नसेल. याउलट हिशेबी, चतुर व अत्यंत व्यवहारी राजकारणी अशीच त्यांची प्रतिमा उभी राहिली. तटस्थपणे विचार केला तर मनोहर जोशी यांच्या काळात सरकारच्या कार्यपद्धतीत, धोरणात बरेच बदल झाले व त्याचा महाराष्ट्राला फायदाही झाला. पण त्याचे श्रेय ना मनोहर जोशींना मिळाले ना बाळासाहेब ठाकरे यांना.
युती सरकारच्या काळात तीन महत्वाचे बदल झालेले दिसतात. महाराष्ट्राचे राजकारण तोपर्यंत मुख्यत ग्रामीण महाराष्ट्र, त्यातही पश्चिम महाराष्ट्राला समोर ठेऊन होत होते. महाराष्ट्र हे झपाटय़ाने शहरीकरण होणारे राज्य असले तरी राजकारणाला शहरी बाज आला नव्हता. मनोहर जोशींनी सरकारचे धोरण ग्रामीण भागाकडून शहराकडे यशस्वीपणे वळविले. केंद्र सरकारने नुकतीच मुक्त आर्थिक धोरण अंमलात आणण्यास सुरुवात केली होती. त्याची काही बीजे शरद पवार यांनी महाराष्ट्रात पूर्वीच घातली होती. मनोहर जोशींचा कारभार हा या धोरणाला अनुसरून होता. सरकारच्या अनेक योजना शहरी विकासाला प्राधान्य देऊन आखण्यास सुरुवात झाली. युतीतील बेबनाव व शिवसेनेची धार्मिक व प्रांतिय अस्मिता यांनाच माध्यमांतून अग्रस्थान मिळाल्याने सरकारी धोरणातील हा बदल अनेकांना टिपता आला नाही.
दुसरा महत्वाचा भाग म्हणजे कृष्णा खोरे प्रकल्पाला युती सरकारने दिलेले महत्व. हा प्रकल्प खरे तर काँग्रेसच्या कारकिर्दीत पुरा व्हायला हवा होता. कृष्णेचे पाणी अडविणे आवश्यक होते. युती सरकारने तो धडाक्याने हाती घेतला. कृष्णा खोरे विकास मंडळ स्थापन करून खुल्या बाजारातून पैसा उभा केला गेला. सरकारने खुल्या बाजारातून पैसा उभे करण्याचे आज अप्रुप वाटणार नाही. पण १२-१३ वर्षांपूर्वी हे मोठे धाडस होते. माध्यमे युती सरकारच्या विरोधात असूनही खुल्या बाजारातून चांगला पैसा उभा राहिला. म्हणजे युती सरकार गुंतवणूकदारांना विश्वासार्ह वाटत होते. परंतु, धडाक्याने घेतलेला हा निर्णय अंमलबजावणीत कमी पडला. खुल्या बाजारातून आलेल्या या पैशाने अनेकांनी खासगी विकास करून घेतला. पुढे तर आर्थिक गैरव्यवस्थापन इतके वाढले की हा पैसा सरकारी कर्मचाऱ््यांचे पगार देण्यासाठी वापरावा लागला. मनोहर जोशी सरकारचे हे सरकारी पातळीवरील अपयश होते. पण राजकीय अपयश त्याहून मोठे होते. कृष्णा खोरे प्रकल्पाचा उपयोग करून शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात आपले स्थान पक्के करता आले असते. मतदारांचे आर्थिक हितसंबंध पक्षाशी जोडून काँग्रेसने जसे जाळे विणले आहे तसे करण्याची संधी शिवसेनेला होती. पण शिवसेनेला ते जमले नाही. सर्व नेते सरकारी पैसा हडपण्यात मश्गुल झाले व सत्तेचा उपयोग करून राजकीय पक्षबांधणीकडे कुणी लक्षच दिले नाही. मनोहर जोशींच्या रुपाने बाळासाहेब ठाकरे यांना कारभारी चांगला मिळाला, पण या कारभाऱ््याचा उपयोग करून ग्रामीण व शहरी भागात शिवसेनेला भक्कम करणारे अन्य नेते बाळासाहेबांना उभे करता आले नाहीत. उलट सर्व नेते मनोहर जोशींना खुर्चीवरून खेचण्यात अधिक रस घेऊ लागले.
रस्तेबांधणी करून दळणवळण अधिक चांगले करणे हा युती सरकारचा तिसरा विशेष होता. याचे बरेच श्रेय नितीन गडकरी यांच्याकडे जात असले तरी सुरुवात शिवसेनेने केली होती. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हे त्याचे ठळक उदाहरण. माधव जोग यांची ही मूळ कल्पना. १९९०च्या युतीच्या जाहीरनाम्यात या रस्त्याचा उल्लेख आहे. १९९०साली युतीचे सरकार आले नाही. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ही योजना शरद पवार यांच्याकडे सुपूर्त केली. पण पवारांनी काहीही केले नाही. युतीच्या काळात कमी पैशात हा रस्ता तयार झाला. त्यावेळी या योजनेवर बरीच टीका झाली. पण बदलत्या आर्थिक परिस्थितीत अशा रस्त्याची गरज होती हे आता प्रत्येकजण मान्य करीत आहे. शहर केंद्रीत धोरणाला अनुसरूनच हा प्रकल्प होता.
कृष्णा खोऱ््याप्रमाणेच फसलेली दुसरी योजना म्हणजे मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास. झुणका भाकर केंद्रे व झोपु योजना या प्रथम टीकेच्या व नंतर युतीची खिल्ली उडविणाऱ््या योजना झाल्या. मात्र या योजनांच्या मूळ स्वरुपाचा जर अभ्यास केला तर शहरी गरीबांना रोजगार व घर मिळवून देणाऱ््या या योजना होत्या हे लक्षात येते. शिवसेना नेतृत्वाने आपली तीव्र इच्छाशक्ती या योजना कार्यक्षमतेने मार्गी लावण्यासाठी वापरली असती व मुख्य म्हणजे कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन केले असते तर मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्याची वेळ आली नसती. आज मुंबईत गरीबाला एकवेळ रोजगार मिळेल, पण घर मिळणे सर्वथा अशक्य आहे. गरीब सोडा, उच्च मध्यमवर्गालाही घर घेणे अशक्य झाले आहे. झोपडपट्टी योजनेतून या शहरात गरीबांसाठी स्पेस तयार होत होती. पण भ्रष्टाचाराच्या दलदलीत ही योजना रुतली व आता मुंबई फक्त अतिश्रीमंतांची झाली. याचा दोष म्हटले तर मनोहर जोशींना मुख्यमंत्री म्हणून देता येईल. किंवा शीर्षस्थ नेते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेही अपयशाची सूई झुकू शकेल. परंतु, खरे तर एकूण राजकीय व सामाजिक व्यवस्थेचा हा दोष आहे. सरकारी धोरणांतील बदल व सरकारी व्यवस्थेचा योग्य असा सामाजिक वापर करून घेण्याचे कसब शिवसेना-भाजपकडे नव्हते हे खरे कारण आहे.
युती सरकारच्या धोरणांमधील हा मुख्य बदल व त्याचे संभाव्य परिणाम हे शरद पवार यांच्या लक्षात येऊ लागले होते असे त्यावेळचे राजकारण बारकाईने पाहणाऱ््यांच्या लक्षात येते. सरकार पाडण्याची खेळी ते करू शकले असते. पण त्यावेळी काँग्रेसमधील त्यांचे स्थान पक्के नव्हते म्हणून ते या फंदात पडले नाहीत. पण मनोहर जोशी यांची पंत अशी ओळख करून देण्यास सुरुवात करून त्यांनी ठाकरेंच्या सर्वसमावेशक राजकारणावर घाव घालण्यास सुरुवात केली. पंतांना नेमून येथे पेशवाई आणली जात आहे हा प्रचार शहराबाहेरच्या मानसिकतेला एकदम पटला. युती सरकारबाबत संशय निर्माण झाला. मनोहरपंतांचे शेतीबाबतच्या ज्ञानाची खिल्ली उडवित त्यांनी हे सरकार शहरी मध्यमवर्गाचे आहे, तुमचे नाही हे महाराष्ट्रात ठसविण्यास सुरुवात केली. भुजबळांनी त्याचवेळी युती सरकारच्या कारभारावर आसूड ओढण्यास सुरुवात केली. त्यांच्यावरील हल्ल्याचे निमित्त होतेच. मुंडे व राणे आतून अस्वस्थ होतेच. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरी शैलीत मनोहर जोशींना फटकारण्यास सुरुवात केल्यावर पवारांना अधिक काही करण्याची गरज पडली नाही. पंतांना शालजोडीतील फटके हाणण्याची एकही संधी बाळासाहेब सोडत नसत. इकडे सिद्धीविनायक व समोर प्रसिद्धीविनायक, अशासारख्या वाक्यांना हेडलाईन मिळत गेल्या. यातून टाळ्या मिळाल्या असल्या तरी शिवसैनिक व मुख्यमंत्री यांच्यात अंतर वाढत गेले. यामुळे हे सरकार आपले नाही असा समज शिवसैनिकांमध्येच झाला. जनतेलाही लवकरच तसे वाटू लागले यात नवल नाही.
मनोहर जोशी तेथे कमी पडले. त्यांनी आपले आसन सांभाळण्यास प्राधान्य दिले. बंडखोरी त्यांच्या स्वभावातच नव्हती. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश येताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन साध्या गाडीने ते घरी रवाना झाले. बाळासाहेबांशी आपण टक्कर घेऊ शकत नाही हे त्यांना पूर्ण माहित होते. पण अन्य नेत्यांसारखा थटथयाट त्यांनी केला नाही. त्यांनी दिल्लीत संपर्क प्रस्थापित केला. महाजनांबरोबरची मैत्री कायम होती. त्याजोरावर तेथे बस्तान बसवून लोकसभेचे सभापतीपद मिळविले. शिवसेनेला हे पद मिळणे अनेकांना मान्य नव्हते. सोमनाथ चॅटर्जी यांनी केलेले भाषण पाहिले तर शिवसेनेबद्दल किती जळज़ळ होती ते लगेच लक्षात येईल. पण जोशींची ती कारकीर्दही यशस्वी ठरली. उलट सोमनाथ चॅटर्जीची वादग्रस्त ठरली. सभापती म्हणून मनोहर जोशींच्या कामाबद्दल एकाही पक्षाने तक्रार केली नाही. एकप्रकारे हा शिवसेनेचा सन्मान होता. पण पक्षाला त्याचाही वापर करून घेता आला नाही.
तरीही मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी फार मोठे काम उभे करू शकले नाहीत. व्यक्तिगत जीवनात ते खूपच यशस्वी झाले. किंबहुना यामुळेच त्यांच्याबद्दल असूया बाळगणाऱ््यांची संख्या फार मोठी आहे. मात्र त्यांना सामाजिक वा राजकीय यश मिळाले नाही. बा़ळासाहेब ठाकरे असताना नरेंद्र मोदींसारखे काम करणे त्यांना शक्य नव्हते हे मान्य केले तरी रमणसिंह, नितीशकुमार, शिवराजसिंह चौहान वा येडियुरप्पा यांच्यासारखा ठसा ते उमटवू शकले नाहीत. ते अनेक बाजूंनी बांधले गेले होते हे खरे असले तरी या मर्यादा झुगारून लांब उडी मारण्याचे धैर्य ते दाखवू शकले नाहीत. त्यांच्यातील व्यावसायिकाने त्यांच्यातील राजकारण्यावर कायम अंकुश ठेवला. सरकारी कारभाराच्या प्रवाहाचे तोंड त्यांनी फिरविले पण या बदलत्या प्रवाहावर पुन्हा काँग्रेस पक्षच स्वार झाला. हे अपयश जोशींचे, ठाकरेंचे, युतीचे की सर्वाचे एकत्रित. याचे स्पष्ट उत्तर देणे कठीण आहे.
शरद पवार यांनी मनोहर जोशींना पंत ही पदवी उपरोधाने व राजकीय उद्देशाने दिलेली असली तरी वस्तुत बाळासाहेब ठाकरे यांचे पंतप्रतिनिधी म्हणूनच ते वावरले. सातारच्या गादीचे पेशवे हे प्रतिनिधी होते तसे मनोहर जोशी हे मातोश्रीचे. पण पेशव्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अटकेपार नेऊन भिडविले व देशाच्या राजकारणात महाराष्ट्राची शक्ती उभी केली. मनोहरपंताना हे जमले नाही. बाळासाहेबांच्या एका शाब्दिक शेऱ््यावरून सरकार अडचणीत येत होते. मी दुसरीकडे पाहात असल्याने त्यांचे वाक्य ऐकले नाही असे साळसूद उत्तर मनोहर जोशी यांनी त्यावेळी दिले होते. मार्मिक मनोहरी उत्तर असे त्याचे वर्णन त्यावेळी करण्यात आले होते. मनोहर जोशींचा स्वभाव, त्यांचे यशापयश व बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध याचे अर्कचित्र या वर्णनात पाहायला मिळते. या मार्मिक मनोहर पंतप्रतिनिधीने महाराष्ट्राचा कारभार साडेचार वर्षे हाकला. कभी खुषी, कभी गम या रितीने.

जन्म : २ डिसेंबर १९३७ (नांदवी, रायगड)
भूषविलेली अन्य पदे
१९६८ मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक. १९७६ मध्ये मुंबईचे महापौर.
१९९० मध्ये विधानसभेवर निवड. १९९१ डिसेंबपर्यंत विधानसभेतील विरोधी पक्षनेते.
केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री ’ लोकसभा अध्यक्ष ’ सध्या राज्यसभेचे खासदार.
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
१४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
पक्ष : शिवसेना
१९७२ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवड

प्रशांत दीक्षित,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०