Thursday, January 13, 2011

जागता राजा- संभाजी

मला आवडलेला एक सुंदर लेख----
--------------------------------------------

सुराज्याच्या निर्मितीसाठी राजे शिव छत्रपतींच्या मोहिमा सतत राबत होत्या. प्रजेला जाणता राजा मिळाला होता. हिंदवी स्वराज्याच्या सीमा रुंदावत होत्या. महाराज राज्यविस्तर आणि रयतेच्या हितासाठी रातदिन एक करीत होते. आईविना राजपुत्र संभाजी आजी जीजाऊच्या छत्रछायेखाली मोठे होत होते. आजीचं वार्धक्‍य, पुतळाईचं प्रेम राजपुत्र संभाजीला मोठं करण्यात जीवाचं रान करीत होतं. अधेमेधे पित्याचा वरदहस्त बापाच्या काळजीनं डोक्‍यावरून फिरत होता. त्यात युद्धाचं शिक्षण, संस्कृतचा अभ्यास, हिंदी भाषेचे ग्रहण, शरीर कसरत यात संभाजीचे सात वर्ष कसे निघून गेल, हे कळलंच नाही. वयाच्या आठव्या वर्षी मात्र फार मोठा अनुभव संभाजीच्या वाट्याला आला. राजकारणाच्या डावपेचात छत्रपती शिवाजी राजांसोबत त्यांचा वारस शंभू बाळाला औरंगजेब बादशहाच्या नजर कैदेत जाव लागलं. कोवळ्या मनाची पाटी चाणाक्ष राजनितीचे अक्षर उमटवून घेण्यास पित्याबरोबर सज्ज होती. अगदी वयाला न शोभणाऱ्या धैर्य धाडसाच्या धारणेसाठी दिल्ली दरबारातील अनुभव मनाच्या गाभाऱ्यात अमीट कोरल्या गेले. आग्रा किल्ल्यातील तुरुंगवासात पित्याचा अमूल्या सहवास आणि प्रतयक्ष कृती शिक्षण संभाजीच्या भविष्यातील मुत्सद्‌देगिरीची शिदोरी ठरत होती. काय अवस्था होत असेल पित्याची आणि त्या बाळ शंभूंची सर्व घटनांचा अमीट ठसा त्या बाळमनावर, त्याच्या हृदय पटलावर उमटत होता. वडिलांची चतुराई, कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचं अद्वितीय कसब, धीरता, गंभीरता, मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटण्याचा जीवघेण प्रसंग, यातुन दुर्मिळ जीवनविद्येची संजीवनी अपसुक प्राप्त होत होती. शिवाजी महाराजांसारख्या युग पुरूषाच्या सर्व क्रीया कलपांचा प्रत्यक्षदर्शी केवळ आठ वर्षाचा कोवळा शंभू एकाच वेळी अनेक विद्यांच्या गृहपाठातून तावून सुलाखून तयार होत होता. ह
े संस्कार जगात एकमेव आणि अनाकलनीय ठरावेत, धैर्य, निर्भिडता, चातुर्य, मुत्सद्‌देगिरी, जीवाची पर्वा न करता हे सर्व रयतेच्या भल्यासाठी कष्ट सहन करण्याचे अमौलीक गुण संभाजींनी आत्मसात केले. तेही प्रत्यक्ष आपल्या पिताश्रींकडून धन्य ते बालपण धन्य ते संस्कार.
पौगंडावस्था आता कुठे येऊ घातली असतांना अवघ्या 15 व्या वर्षी 10,000 ची फौज घेऊन मुलुखगिरीला राजपुत्र संभाजीला जावं लागलं. राजपुत्राची पूर्ण ओळख एव्हाना शिवाजी राजांना झाली होती. सिंहाच्या छाव्याला सावजापासून जास्त वेळ रोखू नये. पराक्रमाची कथा सुंदर असली तरी ती प्रतयक्ष अनुभवल्या शिवाय शूरवीर होता येत नसते. "युद्धस्त वार्ता रम्या' असं वर्णन करणारे शब्द समूह जुळवून त्यातून कथाकार निर्माण करायचे नव्हते. राजांना युद्घाचा प्रत्यक्ष अनुभव देवून महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा वारस रयतेला निर्माण करवून द्यायचा होता. समक्ष, अगदी स्वत:सारखा नव्हे, काकणभर अधिकच, युद्ध म्हणजे सर्वशक्ती, युक्ती, बुद्धीच्या संयोगाने, शरीर, मन-बुद्धी-आत्मा एकवटून शत्रूशी द्यावयाची पराक्रमी झूंज. काळ-काम-वेग चतुराई सर्व पणाला लावून शत्रुला नामोहरम करणं म्हणजे युद्ध कुठल्याही गणिताची एकही पायरी चुकली की शीर धडापासून वेगळ म्हणजे जीव घेताना, जीव अर्पण कराव लागू शकतो, यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर अष्टावधान जपत स्वत: वार न लागू देता शत्रूवर वार करणं म्हणजे युद्ध, युद्धकरी 6वारकरी' असलयाशिवाय विजयी होऊ शकत नाही. युद्धात जय मिळवून परतु शकत नाही, हा कोवळा राजपूत्र सैन्य, रसद, व्यूहरचना, मनोबल, प्रशासन, युद्धनिती, हेरगिरी, खबरे, हुजरे, खेमे, तंबू, तलवारी, तोफखाना, दारूगोळा, गुप्तात, गनिनी, या सर्व युद्ध सायुज्जतेच्या शासन प्रशासनात एवढा तरबेज निघाला की आदिलशाही राज्यात घूसून गोवळकोंडा आणि आजूबाजूचा भूभाग काबीज केला. हुबली व रायबागची मोहीम फत्ते केली.
खानदेश आणि गुजरात व स्वारीची मोहीम विजयी करून शंभू राजांनी शत्रूवर जबरदस्त दरारा निर्माण केला. संभाजीच्या नावाने शत्रू रणांगण सोडू पळू लागलेत. मरणाच्या भितीने अनेकांनी शरणागती पत्करली. संभाजीच्या या वयातील शौर्याला जगाच्या इतिहासात तोड नाही, जोड नाही, शौर्य आणि पराक्रमाची कीर्ती दूरवर पसरू लागली. त्याची दखल इत्तिहासकारांना आणि प्रामाणिक बखरकारांना घ्यावीच लागली. विदेशी लेखकांनीही त्यांच्या अजोड शौर्य आणि पराक्रमाची नोंद घेतली आहे. प्रजेला शिवाजींचा खरा वारस लाभल्याचा आनंद स्वर्णीमच ठरावा. प्रजेत त्यामुळे या तेजस छाव्याची प्रतिमा उंचावली गेली. सैनिकांचं मनोबल प्रचंड उंचावल्या गेलं. संभाजीच्या सैन्यात जाण्यासाठी तरूण आणि जाणते वीर पुढे स्पर्धा करू लागले. ही त्या वयातील शौर्यवान, धाडसी, युद्ध निती निपूण वीर राजपुत्र संभाजीला देशातील मर्दांनी दिलेली पावती होती. शंभू राज्याचं नेतृत्व स्वीकृत झालं.
एकीकडे युद्धनिपूण नेतृत्वगुणसंपन्न बलशाली संभाजीची युद्धकठोरता, कर्मठता, युद्धनितीकुशलता ज्या वयात प्रस्फुटीत होत होती त्याच वेही एक साहित्य प्रेमी, संवेदनक्षम "संभा' काव्यअलंकार, शास्त्रपुराण, प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करीत होते. नीती, दंडनीत, धनुर्विद्या, इतिहास, राजकारण, राजा, मंत्री, सेना, प्रशासनापासून तर संत कबीर, रविदास, देव देवतांची चचित्रं, नृत्य, मुद्रा, ताल, लय, गती, सूर, या सोबतच अनेकविध कला साहित्याच्या चिंतन मनन लेखनातही दंग होते. विविधांगी अभ्यासाचा पिंड असलेला हा जागाच्या पाठीवर एकमेव राजपुत्र असावा. युद्धप्रशासन, राजकारण आणि भाषा कला व साहित्याचा असा समन्वय खरंच भारत भूमीत कुठं असू शकेल? राम आणि कृष्ण द्वापार त्रेतातील पण हा शंभू आजचा आहे, तुमच्या माझ्या कुनब्यातला.
वयाच्या 14 व्या वर्षी संस्कृत भाषेतून "बुधभूषण' ग्रंथाची निर्मिती संभाजींनी केली. त्याचबरोबर नखशिख, सातशतक, नायिका भेद हे हिंदी आणि ब्रजभाषेतील ग्रंथ संभाजी राजेंनी त्या वयात लिहून साहितयाची सेवा केली. ज्ञानेशांच्या प्रज्ञेची इथे तुलना नको. पण, एवढ्याशा वयात संभाजीची ही साहित्य सेवा अद्वितीय ठरते. युद्ध आणि साहित्याचा अनोखा व्यक्तीरंग संभाजी, आजच्या पिढीलाच नव्हे तर कुठल्याही पिढीतील तरूणाईला म्हणूनच संभाजी हे सर्वांगाणी आदर्श ठरावेत, यात मुळेच अतिशयोक्ती नाही. सुदृढ शरीर कमवावं लागतं. बलंदड शरीर, शरीराची उर्जा मेहनतीनी कमवावी लागते. यम, नियम, आसन, प्राणायम, ही त्याची पूर्वपीठिका असते. आहार विहार विचार आणि आचार त्यासाठी नियंत्रित असावेच लागता. विद्यंची आराधना करावी लागते. "विद्यातुरीणां न सुखं न निद्रा'. सर्व प्रकारच्या ऐशआरम सुखवृत्तीचा त्याग करतो, त्यालाच विद्या प्राप्त होते. संभाजींनी अनेक विद्यांची प्राप्ती केली ती या न्यायाने. शौर्य, पराक्रम, प्रशासन, राजकारण, साहित्य निर्मिती, स्वराज्याचा विस्तार, रयतेचं सुख आणि जनहित पालन यासाठी "तप' आवश्‍यक आहे. "तपसा प्राप्यते यश:' तपा शिवाय यश प्रापत होऊच शकत नाही. संभाजींनी यासाठी तपसिद्धी केली. म्हणूनच कार्यसिद्धी त्यांना प्राप्त झाली. परिस्थितीची प्रतिकूलता असातनाही हे साध्य करणं अत्यंत दुरापास्त आहे. तपाचा अर्थ अथक परिश्रम, इथे महत्त्वाचा ठरतो. तपाशिवाय माणसाची पत नसते. तप आणि पत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजच्या नैराश्‍यातील तरूणाईला संभाजी समजावा. मर्दासारखं जगायचं? संभाजी समजून घ्या.
जगायच मर्द होवून, मरणाला सुद्धा सामोरं जाता याव मर्दपणानं, संभाजी सारखं प्रतिकूल परिस्थितून मार्ग कसा काढावा तो संभाजी राज्यांसारखा. घरच्यांचा दुस्वास कितीही होवो. कुटीलांचे मनसुबे कसेही असू देत. चारित्र्य हननाचे प्रसंग कितीही असोत. जीवावर सतत बेतणारी जीवघेणी धूर्तता असू दे. जीव नकोसा करणोर प्रसंग कितीही असोत. या सर्व भीषण परिस्थिीतून तावून सुलाखून ध्येय निश्‍चितीचा बाणा संभाजींनी बाळगला. हा आदर्श आहे अष्ट प्रधानांचे कट कारस्थानाला दंडनीतीचा अवलंब करून कडक प्रशासनाची जरब बसविली. हे आपण विरणार का? घरातील सावत्र आईला पुत्रप्रेमाच्या राज्यपदाचा लोभ देवून किंवा तसा प्रसार प्रचार करून परहसते संभाजीला जीवानिशी मारण्याचे किती बेत करावेत आस्थिनीतील सापांनी? तीन वेळा हे कट उघडकीस येऊनही संभाजींची कडक समज देऊनही जेव्हा घरभेदी स्वार्थापोअी अंधानुकरण करते झाले, तेव्हा दंडनीतीच्या प्रशासनातील हत्यारं उपसली गेली. थोरल्या महाराजांच्या जीवाला जीव देणारी माणसं स्वातंत्र्योत्तर काळात रयतेला दु:ख देऊ लागणे, हे लांछन नव्हे काय? स्वराज्यापूर्वी घेतलेल्या आणाभाका आणि प्रतीज्ञा नंतर कां विरल्या जाव्यात? वतनासाठी वतनाशी गद्दारी करणाऱ्यांची संभाजींनी का गय करावी? स्वराज्याचं सुराज्य करणारी ही व्यवस्था, भ्रष्टाचार, सुखलोलुपता, स्वार्थांधता, अनागोंदी अजराजकतेकडे वळती होताना, किती दुर्लक्ष करावं? ही लाख मोलाची माणसं, त्यांनी स्वराज्यप्राप्तीसाठी केलेला त्याग, स्वातंत्र्योत्तर काळात भोगासाठी फितुरी करण्यात घालवावा, हे भीषण वास्तव नाही काय? परकीय असलेला औरंगजेबाच्या मुलाला "अकबर' याला वाचविण्यासाठी आलमगीर बादशहाचा रोष पत्करण्याची भीती झुगारणारा संभाजी आप्तस्वकीयांना मृत्यूदंडासारखी कठो शिक्षा कां देतो? फितुरी म्हणजे राजद्रोह रयतेच
्या हिता आड येणारांना शांती समाधानाची समजुतीची भाषा आणि प्रयत्न गळी उतरत नसतील तर राजांनी काय करावं? वत्रनात सुधार होत नसेल, चूक एकदा दोनदा क्षम्य केल्यानंतरही कट कारस्थानात मशगुल अष्टप्रधानातील प्रशासकांना, संभाजींनी दिलेला देहदंड अशोभनीय ठरत नाही. "राजा ना पृथ्वीपती', राजा हा रयतेचा विश्‍वस्त असावा. रयतेच्या भल्याआड येणारांची मग तो कितीही त्यागी आणि महान असला तरीही रयतेच्या शत्रूंना माफी नसावी, त्यांची मुरव्वत करता कामा नये. भूतकाळातील सूकर्म वर्तमानातील दुष्कर्माला किती अप्रुप ठरावेत? वर्तमानातील जगण्यासाठी सर्वांना सुख, शांती, स्वस्थता देणारी व्यवस्था ही सुराज्याची व्यवस्था. ती विस्कळीत करणाऱ्यांना दंडनीतीचा अवलंब आवश्‍यक असतो, हा संदेश संभाजींच्या या कृतीतून रयतेपर्यंत स्पष्ट उद्‌घोषित झाला.
वर्तमान तरूण पिढ्यांना 8-10 पिढ्यांआधीची जवळपास 350 वर्षापूर्वीची ही घटना आजही राज्य व्यवस्थेसाठी प्रेरणादायी ठरत नाही काय? अण्णाजी, हिरोजी या सारख्या महाराजांच्या सोबत्यांना मृत्यूदंड देतांना संभाजींना किती यातना झाल्या असतील? पण रयतेच्या आणि व्यवस्थेच्या हितासाठी त्याला पर्याय नसावा. रयतेचं सुख, राज्यावा विस्तार, मोहिमांची आखणी आणि पूर्ती करण्यात पुढचा काळ वादळी वाऱ्याच्या घोंघावात झपाटलागत पळत होता. कित्यक मोहीमा फत्ते तर कधी गतिरोधाला सामोरं जावं लागलं. जंजीरा अजूनही अनेकदा प्रयत्न करूनही सर होत नव्हता. त्यासाठी मध्ये एक चढाईची अनोखी पायरी शंभूराजांनी निर्माण केली होती. अनेक मुलुख स्वराज्यात सामील केले. त्रिचनापल्ली पर्यंत मोहीम फत्ते केल्यात. बुऱ्हाणपूरहून दौलत आणली. राज्य विस्तार झाला. रयतेला कडक प्रशासन आणि त्यांचा राजा मिळाला. लोकप्रियता प्रचंड वाढली. राजांना नजरभर पाहण्यात धन्यता मानणाऱ्यांची संख्या वाढतच होती. आलमगीर औरंगजेबाचे सर्व मनसुबे धुळीला मिहाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर छत्रपती संभाजीशी लढण्यात आता जवळपास 8 वर्षाचा कालावधी उलटला होता. निराश, हताश औरंगजेबाची प्रतीा पूर्ण होण्याचे सर्व मार्ग निमुळते होत होते. फंदफितुरी, कटाकरस्थान, प्रलोभनं काम करेनासे होत होते. लाखोंच्या वर यवनांच्या फौजेला खुद आलमगीराच्या हजेरीत दखनात एकही गढ किल्ला हस्तगत करता आला नाही. प्रशासनावरील जरब, अष्टप्रधानांवर अचूक वचक, येसूबाईची राज्यकारभारवर असलेली जीजा दृष्टी, राज्यशकट निर्धोक चालत असल्याची ग्वाही होती, संभाजी राजांना मोहिमेवर असतांना "सब ठीक ठाक है' ची आंतरग्वाही देत होती. मोहिमेवर असताना म्हणूनच राजांना "इकडली' फारसी काळजी नव्हती. आप्त स्वकीयांची चाललेली वतनं मिळविण्याचे खआटोप छत्रपती शिवाजीं
च्या काळापासून आजही मात्र छुप्या रितीने सुरूच होते. तो त्रास मात्र कायम होता. दुसऱ्या शत्रूंशी दोन हात करणं सोपं असतं. पण, घरातील नातलग आप्त संबंध ही बाब फार नाजूक आणि घातक ठरते. वतनं वाटण्याची प्रथा थोरल्या महाराजांनी बंद केलेली संभाजींनी सुरू करावी, अशी अनेकांची सुप्त इच्छा हाती. संभाजींनी महारजांचीच प्रथा सुरू ठेवली. सत्ता लोलुपता आणि नात्यांची दुर्बलता अशी कात्री होतीच. येसुबाईचे कान हे ऐकून आताशा बधीर झाले होते. परंतु गणोजी शिर्के या आपल्या बंधूकडून होत असलेल्या ईनामी वतनाच्या मागणीनी, येसुबाई त्रस्त होत्या. निर्वाणीच्या शब्दात सांगूनही बंधू राजेंचे बेताल बोलने बंद होत नव्हते. दगाफटका तर होणार नाही ना अशी शंकेची पाल कधी चुकचुकत असे. मनचिंती ते वैरी न चिंती, अशुभाची कल्पनाही अंगावर काआ आणतो. शरीराला त्राणहीन करते. औरंगजेबाच्याप्रचंड सैन्याला संभाजींची सेना आजवर पुरून उरली होती. आमोरा समोरीपेक्षा डोंगर चढ उतरणीचं युद्ध निपूर्ण असलेली, संभाजींच्या मलकापुरी सैन्यातील तरूण योद्धे क्षणात विजेसारखे आता इथं तर क्षणार्धात दुसरीकडे दिसत. या सेनेचा प्रचंड धसका मागेल सैन्यांनी घेतला होता. त्यामुळे मराठ्यांच्या राज्यातून हात हलवत तसंच परत जावं लागणार, ही भीती औरंगजेबाला वेडा करून सोडीत होती. क्षणोक्षणी जळी, काष्टी, पाषाणी शिवाजींच्या दहशती सारखे आता त्याला संभाजी दिसत होते. सैन्यांनी संभाजीचा इतसका धसका घेतला होता, की "शेर का बच्चा काहॉ से आएगा मालुमही नही होता, अरे वो तो हवा का नाम है संभा' चपळता घेरेबंदी आणि गनिमी युद्धात तरूण मावळे निपूण होते. प्रत्यक्ष युद्धात संभाजींना जिंकण अशक्‍य असल्यामुळे फितुरीचं हत्यार तेवढं चालवायच असं ठरलं. घात लावल्या गेला. संभाजींचा साळा येसूबाईचा भाऊ गणोजी शिर्के शेवटी गळाला लागला. त्यांनी कट रचून आ
लमगिरीला माहिती पुरवून राजे संभाजींना पकडून देण्यात मदत केली. संभाजींना घात लावून पाळत ठेवून फंद फितुरीनी पकडण्यात आले. बादशाहाला धन्यता वाटली. थोर माणसांचं रणांगणावरील कर्तृत्व घरातील घरभेद्यांमुळे पराभूत होण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. घनघोर घात झाला. आपल्या घरातील माणसांनी घात केला. औरंगजेबांनी संभाजी राजांना भरपूर प्रलोभनं दाखविली. स्वाभीमानाची किंमत आपला प्राण देऊन राजांनी चुकती केली. औरंगजेबाला शेवटी पराभूत व्हावं लागलं. अत्यंत क्रूरपणानं संभाजींच्या देहाच्या खांडोळ्या खांडोळ्या करून, कातडी सोलून, रक्तामासाचे तुकडे करून फेकून देण्यात आले. त्यांचा अग्निसंस्कार होवू नये म्हणून दवंडी पिटविली. एका परीट स्त्री मुळे गावातील महिला पुढे होऊन गावकऱ्यांच्या मदतीने रात्री त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आला. राष्ट्रासाठी, स्वामीमानासाठी, राष्ट्रवादासाठी, रयतेसाठी, धर्मासाठी अवघ्या वयाच्या 32 व्या वर्षी शंभूराजे शहीद झाले. आजच्या पिढीच्या तरूणाईंनी नवचेतना स्फुर्ती घेण्याचा तो बलिदान दिवस स्वातंत्र्याचं सुराज्य करण्याचे स्वप्न बाळगून छत्रपती शिवाजींनी दिलेला वारसा स्वाभीमानाने जगणाऱ्या ध्येयवेड्या तरूण छत्रपती संभाजींची वीरगाथा, आजच्या पिढीला आदर्शवत आहे. आज या मरगळ आलेल्या तरूण पिढीला जीवन जगण्याचा आदर्श मार्ग संजीवन म्हणजे संभाजी राजे.
संभाजी राजे कसे होते? असा प्रश्‍न उपस्थित झाल्यास प्रत्येक तरूणाईचं उत्तर असावं :-

-------
"स्वाभिमानाचा संबळ, संभाजी
धर्माचा आदर, संभाजी
राष्ट्रवादाचा जागर, संभाजी
शिवसईचा पूत्र, संभाजी
जीजाऊंचा कुसव, संभाजी
तरूणाईचा गर्व, संभाजी
मर्दांचा मर्द , संभाजी
कुटीलांचा नाशक, संभाजी
कलेचा उपासक, संभाजी
साहितय निर्मिक, संभाजी
येसूंचा विश्‍वास, संभाजी
रयतेचा राजा, संभाजी
मरणाचा उजाळा, संभाजी
ज्ञानीयांचा ज्ञाना, संभाजी
सिंहाचा छावा, संभाजी
तेजाचा पुतळा, संभाजी
नीतीचा दंडक, संभाजी
सत्याचा रक्षक, संभाजी
जागता राजा, संभाजी'
अशा या "जागता राजा संभाजी' या कोटी कोटी दंडवत.

----------


0 डॉ. शरद निंबाळकर

No comments: